Uddhav Thackeray : ठाकरेंना आणखी एक धक्का ! ‘ही’ बुलंद तोफ अजित पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

मुंबई : विधानसभेनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेईना. अनेक नेते ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. मात्र आता शिंदेनी नाहीतर अजित पवारांनी ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला आहे. ठाकरेंची बुलंद तोफ अशी ओळख असलेली महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या विधानसभेच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश होणार आहे.
स्नेहल जगताप यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यावर त्यांची तोफ अवघ्या राज्याने पाहिली. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यामुळे आता त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्नेहल जगताप यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश हा फक्त उद्धव ठाकरेंनाच नाहीतर भरत गोगावलेंसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.
का निर्णय घेतला?
“विधानसभा निवडणुकीत मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत माझ्यावर ९२ हजार लोकांनी विश्वास दाखवला. त्या विश्वासाला डोळ्यांसमोर ठेवून, विकासात्मक दृष्टीकोन ठेवून माझा मतदारसंघ पुन्हा प्रगतीपथावर आणायचा आहे त्याकरता मी हा निर्णय घेतल्याचे स्नेहल जगताप म्हणाल्या.
भरत गोगावले यांची डोकेदुखी वाढणार?
आज(26 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत येथे हा अधिकृत पक्ष प्रवेश होणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्नेहल जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत भेट घेऊन प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्नेहल जगताप सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे. शिवाय जगताप यांची भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. एकीकडे भरत गोगावले यांच्याशी पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे यांचे वाद सुरू असताना दुसरीकडे तटकरे यांच्याकडून भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने नवा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत स्नेहल जगताप?
स्नेहल जगताप या महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या आहेत. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षात विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत स्नेहल माणिकराव जगताप यांना 91, 232 तर भरत गोगावले यांना 1,17,442 मते मिळाली. या निवडणुकीत 26, 210 मतांनी गोगावले यांचा विजय झाला होता.





