“ज्यांना जायचंय त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही” ; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना झापले

Uddhav Thackeray । राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत नाराजांची संख्या वाढली असल्याचे दिसत आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकीचे संग्राम लवकरच सुरु होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मविआतील घटकपक्ष असणाऱ्या ठाकरे गटातून मोठ्याप्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे
ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही Uddhav Thackeray ।
मातोश्रीवर ठाकरे गटाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी आपल्याला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी खंत अनेकांना बोलून दाखवली होती. .”पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाराजांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक पक्षांतर करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. पक्षात नाराजीचा सूर काढणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
बैठकीत नेमकं काय घडलं? Uddhav Thackeray ।
अलीकडेच मुंबईतील निवडणुकीच्या तयारासाठी मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत अनेक जुन्या नगरसेवकांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवले जात नाही. विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदार संघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते, अशी तक्रार एका नगरसेवकाने केली होती.
एकसंध शिवसेना असताना पक्षाचे नगरसेवक इतक्या उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची हिंमत करत नव्हते. मात्र, विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता पक्षातील नाराजांना उघडपणे नेत्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे. यापैकी अनेकजण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप किंवा शिंदे गटाची वाट धरू शकतात. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश पाहता बहुतांश नाराज नगरसेवकांची पसंती भाजपला असल्याची चर्चा आहे.





