U19 Women’s T20 Asia Cup 2024 : सुपर-4 मध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय, बांगलादेशचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा…

U19 Women’s T20 Asia Cup 2024 (Super 4, IND vs BAN) : महिला अंडर-19 आशिया चषक 2024 स्पर्धेत भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने गुरूवारी झालेल्या सुपर फोरच्या सामन्यात बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करत गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. भारताचा सुपर फोरमधील पुढील सामना आता श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना शुक्रवार 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
टीम इंडियाच्या या विजयात आयुषी शुक्ला आणि गोंगडी त्रिशा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्रिशाने दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले तर आयुषीने गोलंदाजीत नैपुण्य दाखवले.
India Women U19 vs Bangladesh Women U19 | ACC Women’s U19 Asia Cup | Match 8https://t.co/cC7HfvQDXJ#ACC #ACCWomensU19AsiaCup #INDWvsBANW pic.twitter.com/CgQUKDYZvR
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 19, 2024
बांगलादेशने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 80 धावा केल्या होत्या.यादरम्यान संघाकडून मोसममत इवा (19 चेंडूत 14), हबीबा इस्लाम (4 चेंडूत 11), फाहोमिदा चोया (14 चेंडूत 10) आणि निशिता अक्तर निशी (17 चेंडूत 10) यांनी त्यांच्या संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. कर्णधार सौम्या अख्तर केवळ 1, सादिया अख्तर 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली तर आफिया शून्यावर बाद झाली.
भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना धावा करण्याची एकही संधी दिली नाही.यादरम्यान आयुषी शुक्लाने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 9 धावा देत 3 बळी घेतले. याव्यतिरिक्त सोनम यादवने 2 बळी घेतले. शबनम आणि मिथिला विनोदने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
प्रत्युत्तरात बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने अवघ्या 12.1 षटकांत 86 धावा करत सामना जिंकला. यादरम्यान, भारताने पॉवरप्लेच्या आत सानिका चाळके (01) आणि यष्टिरक्षक फलंदाज जी कमलिनी (00) यांच्या रूपाने दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार निकी प्रसाद आणि सलामीवीर गोंगडी त्रिशा या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 64 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सलामीवीर त्रिशा हिने अर्धशतक झळकावले. तिने 46 चेंडूंचा सामना करताना 10 चौकारासह नाबाद 58 धावा तर कर्णधार निक्की प्रसादने नाबाद 22 धावा केल्या. 14 चेंडूंचा सामना करताना तिने 1 चौकार आणि 2 षटकार लगावले. बांगलादेशसाठी अनिसा अक्तर सोबा (4-1-19-02) ही उत्कृष्ट कामगिरी करणारी आणि बॉलसह विकेट घेणारी एकमेव खेळाडू होती.





