Women’s U19 Asia Cup 2024 : नवख्या नेपाळनं पाकचा 6 विकेट्सने उडवला धुव्वा, पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Women’s U19 Asia Cup 2024 (PAK vs NEP) : महिला अंडर-19 आशिया कप टी-20 स्पर्धेला 15 डिसेंबरपासून सुरुवात झाली. दरम्यान, सोमवारी ब-गटातील सामन्यात पाकिस्तान आणि नेपाळ आमने-सामने आले होते, ज्यामध्ये नेपाळने 6 गडी राखून विजय मिळवून क्रिकेट जगताला चकित केले. आता नेपाळने अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे, तर पाकिस्तान संघ गट टप्प्यातील दोन्ही सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पाकिस्तानच्या महिला संघाने प्रथम खेळताना निर्धारित 20 षटकात 104 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेपाळ संघाने एक षटक आणि 6 गडी राखून 105 धावा करत सामना जिंकला. नेपाळची कर्णधार पूजा महातोला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. प्रथम, तिने आपल्या 4 षटकांच्या गोलंदाजीच्या स्पेलमध्ये 27 धावांत 2 बळी घेतले. त्यानंतर फलंदाजीतही पूजाने 47 धावांची नाबाद खेळी करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून देण्यात मोठा हातभार लावला.
Nepal Women U19 scripted history with a commanding 6-wicket win over Pakistan Women U19, powered by the captain’s knock that led the chase with poise. Their brilliant performance ensured a memorable victory on the big stage.#ACCWomensU19AsiaCup #ACC #PAKWvsNEPW pic.twitter.com/g84mQ8xVQ6
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 16, 2024
एकवेळ पाकिस्तानला 100 धावा करणेही अवघड वाटत होते, पण कोमल खानने 38 आणि महम अनीसने 29 धावांची खेळी खेळून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली.
पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…
महिला अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळला ब-गटात ठेवण्यात आले होते. ग्रुप मॅचमध्ये टीम इंडियाने आधीच पाकिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला होता. पाकिस्तान संघाला सुपर-4 मध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याला नेपाळवर कोणत्याही किंमतीत विजय मिळवणे गरजेचे होत. पण, नेपाळने संस्मरणीय विजयाची नोंद करत सुपर-4मध्ये प्रवेश केला आहे तर पाकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
अ-गटात बघितले तर त्यात श्रीलंका, बांगलादेश आणि स्पर्धेचे यजमान मलेशिया यांना स्थान देण्यात आले होते. या गटात श्रीलंका सध्या 2 सामन्यांत एक विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या गटात बांगलादेश आणि मलेशियाचा सामना बाकी आहे. नेट रन रेट पाहता, फक्त श्रीलंका आणि बांगलादेश सुपर-4 टप्प्यात जाण्याची शक्यता जास्त आहे.





