U19 Asia Cup 2024 : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, सेमी फायनलमध्ये श्रीलंकेचा उडवला धुव्वा…

U19 Asia Cup 2024 : टीम इंडियानं 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. भारतानं दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीलंकेचा 7 गडी राखून धुव्वा उडवला आहे. दुसरीकडे बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला जात आहे. यातील विजेता संघ भारताविरूध्द विजेतेपदासाठीची लढत खेळेल.
उपांत्य फेरीच्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्याच्यावरच भारी पडला. श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना भारताने 173 धावांत रोखले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या 21.4 षटकात 3 गडी गमावताना 175 धावा करत सहज विजय साकारला.
Storming into the 𝐅𝐈𝐍𝐀𝐋S! 🥁
India U19 won the thrilling semifinal by a commanding 7-wicket victory over Sri Lanka U19. Chasing 174, the batters went all out, sealing the win with ease. The Boys in Blue are one step away from glory!#ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/KB8eVPKrZh
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 6, 2024
श्रीलंकेसाठी सलामीला आलेल्या दुलानिथ सिगेरा आणि पुलिंदू परेरा हे फलंदाज अपयशी ठरले. दोघांनी अनुक्रमे 2 आणि 6 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शरुजनने 42 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय लकविन अबेसिंघेने 69 धावा करत महत्वपूर्ण योगदान दिले. या दोघांच्या शानदार खेळीमुळे श्रीलंकेचा संघ 46.2 षटकात सर्वबाद 173 धावा करू शकला.
भारताकडून गोलंदाजीत चेतन शर्माने सर्वाधिक 3 बळी घेतले. यासाठी त्याने 8 षटकात 34 धावा खर्च केल्या. चेतन शर्माला यावेळी भारताच्या अन्य गोलंदाजांनी सुरेख साथ दिली. आयुष महात्रे आणि किरण चोरमल यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. त्यामुळेच भारताला श्रीलंकेला 173 धावांत रोखता आले होते.
प्रत्युत्तरात भारताने केवळ 21.4 षटकात विजय मिळवला आणि संघाला अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. भारताकडून सलामीला आलेल्या महात्रेने 28 चेंडूत 34 धावा केल्या. त्याच्यासोबत आलेल्या वैभव सूर्यवंशीने 36 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी केली. वैभवने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. या दोघांनी भारताला 91 धावांची सलामी दिली. आंद्रे सिद्धार्थने 24 चेंडूत 20 धावा केल्या. वैभव आणि आंद्रे सिद्धार्थ बाद झाल्यावर भारताचा कर्णधार मोहम्मद अमान याने नाबाद 25 तर कार्तिकेय के.पी याने नाबाद 11 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोप्तब केले. या विजयानंतर अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो.
अंतिम फेरीत बांगलादेशशी होऊ शकतो सामना…
अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे. बांगलादेश संघ अंतिम फेरीत गेला तर हे दोन्ही संघ 8 डिसेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने-सामने येतील. तर आता अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





