Deepti Sharma : दीप्ती शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मेगन शुट्टच्या जागतिक विक्रमाशी केली बरोबरी

Deepti Sharma Set Record Most Wickets In T20I : भारत आणि श्रीलंका महिला संघांमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकेला ११२ धावांवर रोखले. मात्र, हा सामना भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी कायमस्वरूपी लक्षात राहणारा ठरला आहे.
मैदानावर पुनरागमन आणि विक्रमी कामगिरी –
दुसऱ्या सामन्यात तंदुरुस्तीच्या कारणास्तव विश्रांती घेतल्यानंतर, दीप्तीने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात तिने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात केवळ १८ धावा देऊन ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिने टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १५० विकेट्सचा टप्पा ओलांडला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पुरुष किंवा महिला संघात आजवर कोणत्याही खेळाडूला टी-२० फॉरमॅटमध्ये १५० विकेट्स घेता आलेल्या नाहीत.
Deepti Sharma is now the joint-highest wicket-taker in Women’s T20Is equalling Megan Schutt’s tally of 1️⃣5️⃣1️⃣ wickets 🇮🇳#DeeptiSharma #T20Is #TeamIndia #CricketTwitter pic.twitter.com/21Jq5tD8Sw
— InsideSport (@InsideSportIND) December 26, 2025
मेगन शुट्टच्या विक्रमाशी बरोबरी –
दीप्ती शर्मा आता महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुट्टच्या बरोबरीने अव्वल स्थानी पोहोचली आहे. या दोघींच्या नावावर आता प्रत्येकी १५१ विकेट्स आहेत. मेगन शुट्टने १२३ सामन्यांत १७.७ च्या सरासरीने हा टप्पा गाठला होता, तर दीप्तीने १३१ सामन्यांत १८.७३ च्या सरासरीने ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, जगातील केवळ दोनच महिला खेळाडूंनी आतापर्यंत टी-२० मध्ये १५० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Dhruv Shorey Record : विदर्भाच्या खेळाडूने रचला इतिहास! लिस्ट ए क्रिकेटमध्ये झळकावली सलग पाच शतकं
पुढील सामन्यात इतिहास रचण्याची संधी –
मालिकेतील चौथा सामना दीप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जर तिने पुढच्या सामन्यात एक जरी विकेट मिळवली, तर ती मेगन शुट्टला मागे टाकून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी जगातील महिला क्रिकेटपटू बनेल. दीप्तीने बॅट आणि बॉल दोन्हीने सातत्याने चांगली कामगिरी करून भारतीय संघासाठी ‘मॅच विनर’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या या यशामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळातून तिचे कौतुक होत आहे.





