Suryakumar Yadav : सूर्याने जिंकली चाहत्यांची मनं, वडील गमावलेल्या श्रीलंकन खेळाडूला दिला धीर, पाहा VIDEO

Suryakumar Yadav Video Viral : आशिया कप 2025 च्या सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर सुपर ओवरमध्ये रोमांचक विजय मिळवला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सूर्यकुमार श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेचे सांत्वन करताना दिसत आहेत, ज्याने आशिया कप दरम्यान आपल्या वडिलांना गमावले होते.
सूर्यकुमारचा संवेदनशील हावभाव –
18 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगानिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान दुनिथ वेल्लालागे यांच्या वडिलांचे निधन झाले. सामना संपल्यानंतर दुनिथ घरी परतला होता, परंतु सुपर फोरच्या आधी तो पुन्हा संघात सामील झाला. भारताने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार दुनिथकडे गेला आणि मोठ्या भावाप्रमाणे त्यांचे सांत्वन केले. हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांना भावूक करत आहे.
This moment 🫶#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 #INDvSL pic.twitter.com/RGeDVyD02P
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 26, 2025
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यातील सुपर ओव्हरचा थरार –
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारत आणि श्रीलंका यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने सलामीवीर अभिषेक शर्मा (61) आणि मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा (49) यांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 202 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला निर्धारित 20 षटकांत 202 धावाच करता आल्या, ज्यामुळे सामना सुपर ओवरपर्यंत गेला. सुपर ओवरमध्ये भारताने श्रीलंकेवर मात करत विजय मिळवला.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : यूथ वनडेत वैभव सूर्यवंशीचा नवा पराक्रम; बाबर आझमला मागे टाकत रचला इतिहास!
फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार –
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात आता भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. हा निर्णायक सामना रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. आतापर्यंत टूर्नामेंटमध्ये अपराजित असलेला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तान उत्सुक असेल.





