पुणे | टीईटी उत्तीर्ण होण्यास दोन वर्षे मुदतवाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आदिवासी विकास विभागात विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी किंवा सीटीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामुळे प्राथमिक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. मुदतवाढीनंतरही टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सेवा समाप्त होणार आहेत.
आश्रमशाळा दुर्गम, अतिदुर्गम व डोंगराळ भागात असून, अनेक शिक्षक व शिक्षकेतर पदे रिक्त राहात होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पदे स्थानिक उमेदवारांमधून तासिका तत्त्वावर भरण्यात येत होती.
त्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्या माध्यमातून आधीच पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून तासिका तत्त्वावर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्यास, अशा उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता.
त्याची मुदत जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये संपली आहे. राज्यात उद्भवलेल्या कोविड- १९ प्रादुर्भावामुळे सन २०२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली नाही. सन २०२०- २०२२ या कालावधीत केवळ दोन वेळाच टीईटी परीक्षा झाली होती. त्यामुळे शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशी संधी मिळाली नाही.
त्यामुळेच १ डिसेंबर २०१८ च्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांनाच टीईटीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून सेवाविषयक लाभ मिळणार असून, आता दिलेली मुदतवाढ केवळ एक वेळची बाब म्हणून संधी असेल. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे आदेश आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी पवनकुमार बंडगर यांनी काढले आहेत.





