पुणे जिल्हा | वसतिगृह, आश्रमशाळेच्या मागण्यांंबाबत मंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा

मंचर, (प्रतिनिधी) – घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणारी वसतिगृह आणि आश्रमशाळेच्या विविध मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया पदाधिकाऱ्र्यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या सोबत मुंबई मंत्रालय येथे बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.
या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त नाशिक नयना गुंडे, टीआरटीआयचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आकाश शिंदे व प्रकल्प प्रशासनाचे प्रतिनिधी विपुल टकले,
पिलाजी लांडे हे अधिकारी उपस्थित होते. तर एसएफआयचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, जिल्हा सहसचिव समीर गारे, निशा साबळे, राजू शेळके हे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबतही शिष्टमंडळाने चर्चा केली. मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी दिले. यावेळी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.
सर्व शिष्यवृत्तीधारक आदिवासी विद्यार्थ्यांना शून्य(०) रुपयांत प्रवेश देण्याबाबत परिपत्रक काढण्यात येईल. एमएस सीआयटी, टॅली, टायपिंग प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येईल. नागापूर येथे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पुणे येथील कोरेगाव पार्क येथे २००० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल.
अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन…
जिल्हास्तरावरील वसतिगृहातील जेवणाची डीबीटी बंद करून पूर्वीप्रमाणे मेस पद्धत सुरू करण्याबाबत सरकारात्मक असल्याचेही मंत्रीमहोदयांनी नमूद केले.परंतु सेंट्रल किचन बंदविषयी ठोस निर्णय होवू शकला नाही.
वसतिगृहांच्या जागा कायमस्वरूपी वाढवण्याच्या प्रस्तावावर मंत्रीमंडळामध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
या दोन मुद्द्यांचा योग्य विचार शासनाने करावा. तसेच मान्य केलेल्या मागण्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी न झाल्यास नाशिकच्या आयुक्तालयावर एसएफआय तीव्र आंदोलन करणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.





