Sushma Andhare tweet : राज्याचे बिनखात्याचे मंत्री माणिकाराव कोकाटे झाले आहेत. त्यांच्या क्रीडा खात्यासह सर्व खाती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळात कोकाटे यांना सदनिका प्रकरणी सुनावण्यात आलेली २ वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड कायम ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते असे सांगितले जात आहे. आता त्यांची आमदाराकी देखील धोक्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्रीपद काढून काही उपयोग होणार नाही, तर आमदारकी देखील रद्द केली पाहिजे, अशी मोठी मागणी केली आहे. तसेच त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात माणिकाराव कोकाटे यांचा विषय देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक चिघळवत आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस डॅमेज होईल आणि फडणवीस यांची नेमकी हीच इच्छा आहे, असेही अंधारे म्हणाल्या आहेत. त्यांनी एक्सवरून व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून कोकाटे यांच्या प्रकरणामुळे राजकारण आणखी तापणार आहे. दोन वर्षात दोन विकेट.. देवेंद्रजी, कसल्या स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनाच्या बाता मारताय? असा खोचक निशाणा देखील सुषमा अंधारे यांनी फडणीसांवर साधला आहे. माणिकराव कोकाटे यांचा विषय देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक चिघळवत आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा विषय जितका चिघळेल तितकी राष्ट्रवादी काँग्रेस डॅमेज होईल आणि फडणवीस यांची नेमकी हीच इच्छा आहे. महायुती अंतर्गत सहकाटशहाचं राजकारण कितीही रंगो, काहीही होवो पण विरोधक… pic.twitter.com/fD7qOzgGV9 — SushmaTai Andhare (@andharesushama) December 17, 2025 सुषमा अंधारे ट्वीटमध्ये काय म्हणाल्या? माणिकराव कोकाटे यांचा विषय देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक चिघळवत आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा विषय जितका चिघळेल तितकी राष्ट्रवादी काँग्रेस डॅमेज होईल आणि फडणवीस यांची नेमकी हीच इच्छा आहे. महायुती अंतर्गत सहकाटशहाचं राजकारण कितीही रंगो, काहीही होवो पण विरोधक म्हणून जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही मात्र स्वस्थ बसणार नाही. दोन वर्षात दोन विकेट.. देवेंद्रजी, कसल्या स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनाच्या बाता मारताय… ? नेमकं प्रकरण काय आहे? हे प्रकरण सुमारे ३० वर्षे जुने (१९९४-९५ चे) आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह अन्य दोघांवर आरोप आहे की, त्यांनी खोट्या कागदपत्रांचा वापर करून स्वतःला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखवले आणि मुख्यमंत्री कोट्यातील १० टक्के आरक्षणाचा लाभ घेत नाशिक येथील उच्चभ्र ठिकाणी सदनिका बळकावल्या. या प्रकरणी फेब्रुवारी २०२५ मध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोन वर्षांची कैद आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. १६ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आहे. कोकाटे यांनी या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १७ डिसेंबर २०२५ रोजी अटक वॉरंट जारी झाले असून कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. सध्या माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती आहे. हेही वाचा : शिल्पकलेतील ‘भीष्माचार्य’ काळाच्या पडद्याआड! राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन