Sushma Andhare On Ashish Shelar | “शेलारजी फार डिंग्या मारू नका; गपगार गोधडीत पडा”, आशिष शेलारांना सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर

Sushma Andhare On Ashish Shelar | ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूकीत मोठा फटका बसला आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीने बेस्ट पतपेढी निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलला 21 पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील तब्बल ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. यावरून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.
भाजप पक्ष म्हणून आम्ही ‘दि बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक ‘बेस्ट’मध्ये काम करणाऱ्या कामगारांची होती. यामध्ये राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केले. त्याचे फळ त्यांना मिळाले आणि हातात भोपळा आला, असं मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी म्हंटल होतं.
या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, शेलारजी फार डिंग्या मारू नका. बॅलेटवर निवडणुका घेतल्या की तुम्ही कायम तोंडघशीच पडता.
शिक्षक–पदवीधर–सिनेट निवडणुकीत आम्ही तुम्हाला धोबीपछाड दिलाय. कालच्या निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केल आहे. तेव्हा गपगार गोधडीत पडा, अशी जहरी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.
शेलारजी फार डिंग्या मारू नका. बॅलेटवर निवडणुका घेतल्या की तुम्ही कायम तोंडघशीच पडता. शिक्षक–पदवीधर–सिनेट निवडणुकीत आम्ही तुम्हाला धोबीपछाड दिलाय. कालच्या निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केल आहे. तेव्हा गपगार गोधडीत पडा..!@ShelarAshish https://t.co/FpqjyDpxdN
— SushmaTai Andhare (@andharesushama) August 21, 2025
राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या उत्कर्ष पॅनलला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. पहिल्यांदाच एकत्र आलेल्या या युतीला शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत मात दिली, तर महायुतीच्या समृद्धी पॅनलला सात जागांवर समाधान मानावे लागले.
मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
शशांक राव यांच्या पॅनेलने मिळवली सत्ता
बेस्टच्या 35 आगारांत बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये 83 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. समोर आलेल्या निकालानुसार बेस्ट पतपेढी निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने सत्ता मिळवली आहे.
21 पैकी 14 जागांवर शशांक राव यांच्या पॅनेलने विजय प्राप्त केला. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. तर बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे. Uddhav Thackeray And Raj Thackeray |





