पुण्यातील दुचाकी चोरट्यांना सातारा डीबी कडून अटक

सातारा : सातारा शहर पोलिसांनी राहूल ज्ञानदेव रावते (रा. सोनावडे ता . जुन्नर,सध्या रा. रविवार पेठ, सातारा), शशीकांत आनंदा शिंदे (रा. रांजणगाव, ता. शिरूर) या दोन सराईत दुचाकी चोरांना अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. या आरोपींनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या आरोपीकडून दुचाकीचोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सातारा शहर पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलिस ठाण्याचे पथक शनिवारी चार भिंती परिसरात गस्त घालीत होते. यावेळी एक अल्पवयीन संशयित तरुण दुचाकीवर जाताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्या तरुणाने दुचाकी सोडून पलायनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ती दुचाकी वरील संशयितांच्याकडून आणल्याचे त्याने कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व सहकार्यांनी केली.





