पुणे | २४ तासांत पावणेदोन टीएमसी विसर्ग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी रात्री चांगल्या स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे या चार धरणातून विसर्गात वाढ करण्यात आली होती.
रविवारी दुपारी मात्र पावसाचा जोर ओसरल्यानंतर खडकवासला धरणातून 35 हजार 310 क्युसेकने असलेला विसर्ग दुपारी दोन वाजता कमी करून 26 हजार 345 क्युसेक करण्यात आला. मागील 24 तासांत खडकवासला धरणातून सुमारे 1.63 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले.
रविवारी रात्रभरात खडकवासला-58, पानशेत- 165, वरसगाव-162 आणि टेमघर धरणात 190 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तर, दिवसभरात खडकवासला-18, पानशेत-41, वरसगाव-42 आणि टेमघरमध्ये 45 मिमी पाऊस पडला. पानशेत धरणातून सुरु असलेला 3 हजार 945 विसर्ग रात्री वाढविण्यात आला असून 8 हजार 920 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
तर वरसगाव धरणातून ६ हजार 925 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर टेमघर धरणातून 1 हजार 548 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या तीनही धरणातून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते.
रविवारी रात्री पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरणातून शनिवार रात्री 11 वाजल्यापासून सुरु असलेला 35 हजार क्युसेकचा विसर्ग रविवारी दुपारीपर्यंत कायम होता. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 28.04 टीएमसी म्हणजे 96.19 टक्के पाणीसाठा आहे.




