KH X RK : साऊथ चित्रपटसृष्टीने चित्रपटांच्या जोरावर देशभरातील प्रेक्षक आपल्याकडे खेचून घेतले आहेत. या इंडस्ट्रीत तयार होणारा प्रत्येक चित्रपट आपली एक वेगळी छाप पाडतो. त्यामुळेच साऊथचे चित्रपट सध्या आघाडीवर आहेत, असे म्हटले तर वावगे वाटू नये. आता साऊथ चित्रपटसृष्टीत एक मोठी गोष्टी घडत आहे. या इंडस्ट्रीत मुरलेले दोन सुपरस्टार तब्बल ४७ वर्षानंतर एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हे कलाकार दुसरे तिसरे कोणी नसून रजनीकांत आणि कमल हासन आहेत. कूल रेट्रो स्वॅग असा टॅग देऊन या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या खास पोस्टरमध्ये दोन्ही कलाकारांचे चेहरे दिसत नसले तरी दोन लोकांचे हात दिसत आहेत. दोघांनीही पूर्ण बाह्यांचे लेदर जॅकेट घातले आहेत, एकाकडे सोन्याचे घड्याळ आहे आणि दुसऱ्याने अंगठी घातली आहे. एकूणच हा लूक स्टायलिश आणि रेट्रो फील देतो. रजनीकांत आणि कमल हासन १९७९ च्या “अलाउद्दीन अद्भूत विलाक्कुम” या चित्रपटात शेवटचे एकत्र झळकले होते. याआधी दोघांनी अपूर्व रागंगल, अवर्गल, मुंद्रू मुदिचू आणि पाथिनारू वायथिनिले सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता एका आगामी चित्रपटातून दोघेही पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण पोस्टरवर KH X RK असे लिहिलेले आहे. साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नेल्सन हा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. नेल्सनने यापूर्वी रजनीकांतसोबत “जैलर” मध्ये काम केले आहे. सध्या त्याचे “जैलर २” वर काम सुरू आहे. हेही वाचा : Laughter Yoga: हसा आणि निरोगी रहा! ‘हास्ययोगा’चे जबरदस्त फायदे माहित आहेत का?