Venezuela earthquakes : व्हेनेझुएलात एका मिनिटाच्या अंतराने दोन महाभूकंप.! ३२ जणांचा मृत्यू; शेकडो जखमी
व्हेनेझुएलामध्ये बुधवारी संध्याकाळी लागोपाठ झालेल्या दोन अत्यंत शक्तिशाली भूकंपांमुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान ३२ लोकांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Venezuela earthquakes : – व्हेनेझुएलामध्ये बुधवारी संध्याकाळी लागोपाठ झालेल्या दोन अत्यंत शक्तिशाली भूकंपांमुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान ३२ लोकांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
देशाच्या हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी या जीवितहानीची पुष्टी केली असून, मदत आणि बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
भूकंपाची तीव्रता ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल इतकी इतकी शक्तिशाली होती. बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. या भीषण आपत्तीनंतर देशात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे.
राजधानी काराकासपासून उत्तरेला ३० किलोमीटर अंतरावर असलेला ला गुआयरा हा किनारी प्रदेश या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला असून, रॉड्रिग्ज यांनी या भागाला आपत्ती क्षेत्र घोषित केले आहे.
येथे डझनाहून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखालून लोकांना काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारी वाहिनीवरून धूळ आणि ढिगाऱ्याखालून तीन लहान मुलांना जिवंत बाहेर काढल्याची दृश्ये दाखवण्यात आली.
भूकंपामुळे देशातील मुख्य विमानतळ असलेल्या सायमन बोलिव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठे नुकसान झाले असून ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. राजधानी काराकासमधील भुयारी रेल्वे (मेट्रो) आणि नैसर्गिक वायू पुरवठा सेवा ठप्प झाली असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
१०० वर्षांतील सर्वात मोठा भूकंप (Venezuela earthquakes)

Venezuela earthquakes : व्हेनेझुएलात एका मिनिटाच्या अंतराने दोन महाभूकंप.! ३२ जणांचा मृत्यू; शेकडो जखमी
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, पहिला ७.२ तीव्रतेचा भूकंप मोरॉन शहराच्या पश्चिमेला २२ किमी खोलीवर झाला, तर अवघ्या एका मिनिटानंतर त्याच परिसरात ७.५ तीव्रतेचा दुसरा अधिक शक्तिशाली झटका बसला. व्हेनेझुएलाच्या इतिहासातील गेल्या १०० वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे.
याचे धक्के इतके तीव्र होते की १७०० किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलच्या ॲमेझॉन क्षेत्रातील आणि कोलंबियातील इमारतीही हादरल्या आणि तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने सुरुवातीला त्सुनामीचा इशारा दिला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीचा ओघ (Venezuela earthquakes)
व्हेनेझुएलातील भीषण भूकंपानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जर्मनीने सहा लष्करी मालवाहू विमाने अल्पसूचनेवर तैनात करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी घोषणा संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी केली.
तसेच युरोपियन युनियनने मदतकार्याला गती देण्यासाठी आपली कोपरनिकस उपग्रह देखरेख प्रणाली कार्यान्वित केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विध्वंसाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असून, शक्य ती सर्व मदत करण्यास सज्ज आहे, अशा संवेदना त्यांनी व्यक्त केल्या.
चीननेही व्हेनेझुएलाला आवश्यकतेनुसार सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी फोनवर चर्चा करून अमेरिकेने दाखवलेल्या एकतेबद्दल आभार मानले.
यापूर्वीच अमेरिका, कतार, मेक्सिको, इक्वेडोर आणि एल साल्वाडोर या देशांची बचाव पथके व्हेनेझुएलात दाखल झाली असून चिली, पानामा व उरुग्वेनेही मदतीचे आश्वासन दिले आहे.
जपानमध्येही शक्तिशाली भूकंप
उत्तर जपानच्या इवाते पूर्व किनाऱ्यालगत गुरुवारी सकाळी एक शक्तिशाली भूकंप झाला. जपानच्या हवामान विभागाने या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल नोंदवली असून, त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५० किलोमीटर खोलीवर होता. सुदैवाने, या भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
सकाळी वर्दळीच्या वेळी झालेल्या या भूकंपाचे सौम्य धक्के राजधानी टोकियोपर्यंत जाणवले. सरकारी प्रवक्ते मिनोरू किहारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पासह परिसरातील इतर कोणत्याही अणुसुविधांमध्ये कोणतीही असामान्यता आढळलेली नाही. सुरक्षा तपासणीसाठी काही बुलेट ट्रेन्स आणि स्थानिक रेल्वे सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या.
पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत नागरिकांना भूकंपाच्या संभाव्य धक्क्यांपासून (आफ्टरशॉक्स) सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
काही शाळांमधील वर्ग खबरदारी म्हणून रद्द करण्यात आले. जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायर पट्ट्यात असल्याने जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक मानला जातो.





