Qatar Gas Terminal Blast : कतारमधील स्फोटात १३ ठार तर, ६६ जण गंभीर जखमी
कतारमधील रास लफान औद्योगिक शहरात झालेल्या स्फोटात भारतीयांसह किमान १३ जण ठार झाले, अशी माहिती कतारचे ऊर्जा मंत्री साद बिन श्रेदा अल-काबी यांनी सोमवारी दिली.

Qatar Gas Terminal Blast : कतारमधील रास लफान औद्योगिक शहरात झालेल्या स्फोटात भारतीयांसह किमान १३ जण ठार झाले, अशी माहिती कतारचे ऊर्जा मंत्री साद बिन श्रेदा अल-काबी यांनी सोमवारी दिली.
रविवारी संध्याकाळी रास लाफान औद्योगिक शहरातील बरझान स्थानिक गॅस पुरवठा केंद्रात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ६६ जण जखमी झाले. या घटनेत भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान अल-काबी यांनी सांगितले.
भारतीय बळींची नेमकी संख्या तात्काळ कळू शकली नाही. दोहा येथील भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून मरण पावलेल्या किंवा जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही दूतावासाने म्हटले आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जखमींमध्ये भारत, कतार, टांझानिया, पाकिस्तान, गिनी, नेपाळ, बांगलादेश, केनिया आणि नायजेरियासह विविध देशांतील नागरिकांचा समावेश आहे.
या स्फोटात अनेक जण जखमी झाले असून काही जण बेपत्ता आहेत. भारतीय दूतावासाने या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ तैनात करण्यात आली होती आणि आता आग नियंत्रणात आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.





