पिंपरी | अवैद्यरित्या वास्तव्यास असलेल्या म्यानमारमधील दोघांना देहूरोडमधून अटक

देहूरोड, (वार्ताहर) – लष्करी भाग असणाऱ्या देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील एमबी कॅम्प आणि गांधीनगर येथून म्यानमार देशातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन महिलांसह एकूण चारजण कोणताही वैध पुरावा नसताना अवैद्यरित्या वास्तव्यास असल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे दहशत विरोधी पथकाने शनिवारी अटकेची कारवाई केली. चारही जण मागील बारा वर्षांपासून परिसरात वास्तव्यास होते, अशी माहिती मिळत आहे.
१. शाहीद उर्फ सोहिददुल उर्फ स्माईली कालुस्लाम शेख (वय ३५ सध्या रा. एम्बी कॅम्प, मदिना मस्जीद जवळ, मुळ रा. राकाई शहर, बुथीदंग, म्यानमार) २. मुज्जमील मोहमद अमीन खान (वय ४३, सध्या रा. गांधीनगर, देहूरोड, मुळ रा. नांगचंग, जि. रेकॉग, म्यानमार) आणि २ महिला असे चौघेजण म्यानमार देशातील असल्याचे आढळून आले असून त्यातील पहिल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दहशतवाद विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गेणू पेरणेकर यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, हे चौघे म्यानमार देशाचे नागरिक असून कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून देहूरोड मधील गांधीनगर आणि एम.बी. कॅम्प भागात अवैधरित्या वास्तव्य करताना मिळून आल्याचे तक्रारीत नमूद आहे. हे चौघे २०१२ पासून परिसरात वास्तव्यास असून पुणे येथील दहशत विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४, १४ (अ), १४ (व), १४ (क) पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२, पारपत्र, भारतात प्रवेश १९५० चे कलम ३ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे करत आहे.





