पिंपरी | चिंचोलीत विजेच्या लपंडावाने महिला संतप्त

देहूरोड, (वार्ताहर) – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील चिंचोली परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिकांची आणि विशेषत: महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
ब्रिटीशकालीन वीजवाहिन्या अत्यंत जीर्ण झाल्यामुळे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या तर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या मागणीचे निवेदन महिला सामाजिक कार्यकर्त्या सरला गायकवाड यांनी चिंचोली शिष्टमंडळाच्या वतीने भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांना दिले.
देहू येथून चिंचोली परिसरात वीजपुरवठा केला जात आहे. वीज वाहिन्या खूप जुन्या झाल्याने वारंवार तुटण्याचे प्रकार घडत असून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गत महिन्यात वीज वाहिनी तुटून एक अपघात घडला होता. जीर्ण वीज वाहिन्या अचानक तुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रतिदिन किमान तीन ते सहा सात तास विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे विद्युत यांत्रिक बंद पडल्याने अनेक कामे ठप्प होतात. ऐन गणेशोत्सवात खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याने महिला वर्ग संतप्त झाला आहे.
जीर्ण झालेले विद्युत वाहक तारा काढून भूमिगत केबल टाकण्यात यावे तसेच वाढत्या लोकसंख्या नुसार रोहित्रांतील विद्युत पुरवठा भारही वाढला पाहिजे, आदी तक्रारी कार्यकारी अभियंता देवकर,अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे यांनी समस्या जाणून घेतल्या.
यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करणार असल्याचे ग्वाही महिला सामाजिक कार्यकर्त्या सरला गायकवाड, हेमा ढोबळे, मंजुळा राव, लक्ष्मी मोरे, संजय सावंत, तुकाराम जाधव, जयवंत पानसरे, बाळासाहेब जाधव, सोपान पानसरे आदी शिष्टमंडळांना दिली .
गणेशोत्सव, पितृपंधरवडा, नवरात्री असे यापुढे सण सुरु झाले आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठयामुळे गृहिणींना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. यांत्रिकी उपकरणे बंद पडल्याने स्वयंपाक कामांसह इतर कामेही ठप्प होतात.
खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर त्वरित तोडगा न काढल्यास समस्त चिंचोली महिला वर्गाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.- सरला गायकवाडसामाजिक कार्यकर्त्या,चिंचोली.





