पिंपरी | वाढत्या अतिक्रमणामुळे शहराचे विद्रुपीकरण

देहूरोड, (वार्ताहर) – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पदपथांसह मुख्य रस्त्यांवर दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. तर अरूंद झालेल्या रस्त्यावर सतत धावणारी वाहने यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कसे? असा प्रश्न नागरिक करत आहेत.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालय जवळ हॉकर्स झोन केला आहे. मात्र डॉ. आंबेडकर रोड, मेनबाजार पेठ यासह अबुशेठ रोडवर खाद्य पदार्थांच्या गाड्या, फळे-भाजी विक्रेत्यांची दुकाने, हातगाडी चालक हे रस्त्यावरच व्यवसाय करत आहेत.
भाजी मंडई लगत असणाऱ्या मार्गावर शाळेसमोर, तसेच अबूशेठ रोड, मुंबई-पुणे महामार्गावरील पोलीस चौकी समोरील चौक, विकासनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशा व्यवसायिकांनी जणू हक्काच्या जागा असल्यासारखे अतिक्रमण केले आहे.
विक्रेत्यांकडून अरेरावी –
बोर्डाचे अधिकारी सदर व्यवसायिकांकडून चिरिमिरी घेत असल्याने विक्रेत्यांची भाषा उर्मट आणि अरेरावी वाढली असल्याचा आरोप केला जात आहे. रस्त्यांवरील या वाढलेल्या अतिक्रमणांमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. तर रस्ते अरूंद बनल्याने दररोज वाहतूककोंडीचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. बाजारपेठेत चालणे देखील पादचाऱ्यांना मुश्कील बनले आहे.
व्यापाऱ्यांचे पदपथांवर अतिक्रमण –
रस्त्यालगत ज्यांची कायमस्वरूपी दुकाने आहेत, त्या व्यापाऱ्यांनी देखील पदपथांवर अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. पदपथ आणि सिमेंटचा रस्ता याला जोडून खाजगी काँक्रीटीकरण करून ओटे बनविल्याचे दिसत आहे. या ओट्यांवर स्वतःचे बोर्ड, बॅनर लावण्याचे काम व्यापारी करतात. त्यातून सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असते. अशावेळी पादचाऱ्यांना चालणे कठीण जात असल्याने यामुळे अनेकदा वादविवाद होतात.
जामा मस्जिद येथे कचराकुंडीतील कचरा नित्यनेमाने उचलला जात नाही. त्यामुळे तो कचरा पदपथावर, रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरली आहे. एकेकाळी प्रशस्त असणारा रस्ता, दुभाजक आणि दुतर्फा आठ फुटांचा पदपथ असणाऱ्या डॉ. आंबेडकर रस्त्याची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. अतिक्रमणांमुळे रस्ता हरवला आहे.
पूर्वी नागरिक पुढे येऊन तक्रारी करत होते. परंतु तक्रारदारांचे नाव समोर येण्याचे प्रकार घडल्याने आता कुणी तक्रारी द्यायलाही धजावत नाहीत. या सगळ्यात शहराला मात्र अतिक्रमणाची कीड लागताना आहे





