पिंपरी | पर्यटकांना खुणावतोय घोरवडेश्वरचा डोंगर

देहूरोड, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे शहराजवळील घोरवडेश्वरचा डोंगर सध्या पर्यटकांसाठी हक्काचे ट्रेकिंग सह पर्यटनाचे ठिकाण बनला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असलेला हा डोंगर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना जवळ असल्याने ग्रुप ट्रेकिंग, कुटुंबासह पर्यटन याबाबत पसंतीचा पर्याय ठरला आहे. घोरवडेश्वर मंदिर, अमरजाई देवी मंदिर, ट्रेकींग सोबत परिसरात असलेले कुंडमळा रांजनखळगे आदीमुळे पर्यटकांची पाऊल अपोआप घोरवडेश्वरकडे वळत आहेत.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना देहूरोडजवळ तर पुण्याच्या दिशेने जाताना तळेगावची खिंड ओलांडल्यावर एक भलामोठा डोंगर आपल्या नजरेस पडतो. हाच तो शेलारवाडी जवळील प्रसिद्ध श्री क्षेत्र घोरावडेश्वर डोंगर. डोंगर बराच मोठा असून डोंगराच्या माथ्यावर महदेवाचे प्राचीन मंदिर अर्थात श्री घोरवडेश्वर महादेवाचे देवस्थान आहे. डोंगरावर अनेक लहान मोठ्या लेण्या, गुफा असून येथे सोळाव्या शतकातील महान संत श्री तुकाराम महाराज यांचे वास्तव्य असायचे आणि ते येथे चिंतन, ध्यान करायचे असे सांगितले जाते.
घोरवडेश्वर डोंगर समुद्रसपाटी पासून सुमारे साडेचारशे ते पाचशे मीटर उंच असून ट्रेकिंगसाठी अगदी योग्य पर्याय आहे. डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून काही पायवाटा देखील आहेत. घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दरवर्षी येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, वृक्ष लागवड, स्वच्छता मोहिम राबविली जाते. तर महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा सप्ताह असतो. वर्षभर पर्यटकांचा तर श्रावणात भाविकांचा येथे पूर येतो.
विस्तारलेले तळेगाव दाभाडे, सोमाटणे शहर, खळखळत वाहणारी इंद्रायणी नदी, लोहमार्गावरून धावणारी रेल्वे, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या गाड्या, जवळच असणारी गणेशाची महामूर्ती आणि हिरवा शालू नेसलेली भूमाता असे नयनरम्य दृष्य आपल्याला घोरवडेश्वर डोंगराच्या माथ्यावरून पाहायला मिळते आणि डोळ्यांचे पारणे फिटते.
पांडवाचे घोरवडेश्वर डोंगरावर वास्तव्य –
घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याला पांडव कालीन अमरजाई माता अर्थात अमरदेवी मातेचे मंदिर आहे. हे मावळ तालुक्यातील एक प्रसिद्ध शक्तीपीठ असून जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. शेलारवाडी गावची ही ग्रामदेवता आहे. देवीला अमरदेवी नावानेही संबोधले जाते.
असे सांगितले जाते की, पांडव चौदा वर्षे वनवासात असताना काहीकाळ घोरवडेश्वर डोंगरावर वास्तव्यास होते. दरम्यान पांडव एका दगडी पाषाणासमोर ध्यानस्थ बसले असता समोरील शिळा दुभंगुन साक्षात अष्टभुजा देवी प्रकटली. देवीने पांडवांना पुढील काळ सुखी होऊन तुम्ही सर्व अमर व्हाल, असा आशीर्वाद दिला आणि देवी अंतर्धान पावली.
म्हणून पांडवांनी देवीला अमरजाई किंवा अमरदेवी असे संबोधले. त्या पौराणिक काळापासून अमरजाई देवीची स्वयंभू मूर्ती प्राप्त झाल्याची अख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. शेलारवाडीतील ग्रामस्थांनी १९६४ मध्ये अमरजाई देवीचे मोठे मंदिर बांधले. हे मंदिरही पर्यटकांसह भाविकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.





