‘मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा’; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघात, अमित शहांना म्हणाले ‘अॅनाकोंडा..’

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच अनुषंगाने, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या ‘निर्धार मेळाव्यात’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
‘दोन व्यापाऱ्यांचा मुंबईवर डोळा’
उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता ‘दोन व्यापाऱ्यांचा’ मुंबईवर डोळा असल्याचा घणाघात केला. “मुंबईवर कोणाचा डोळा आहे हे तुम्हाला माहिती आहे. खासकरून दोन व्यापाऱ्यांचा मुंबईवर डोळा आहे,” असे ते म्हणाले. या टीकेचा रोख थेट मोदी आणि शाह यांच्यावर होता, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. तसेच, त्यांच्याकडे (भाजप/शिंदे गट) ‘पैसे असतील, पण जीवाला जीव देणारे माणसं नाहीत,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
अमित शाहांना अप्रत्यक्ष ‘अॅनाकोंडा’ उपमा –
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना ‘अॅनाकोंडा’ असे संबोधले. “आज एकजण मुंबईत येऊन गेले… जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार,” अशी बातमी वाचल्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, “अॅनाकोंडा म्हणजे सर्व काही गिळणारा साप होय आणि तो आज इकडे येऊन भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे.” ‘मुंबई गिळायची का? पाहतो कशी गिळणार ते. नाही पोट फाडून बाहेर आलो तर नाव सांगणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.
याचबरोबर, आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावर बोलताना, याची सुरुवात मुंबईतून करून हे काम महाराष्ट्रभर करायचे आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.





