नांदेड गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

नांदेड : नांदेडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात एटीएसच्या पथकाने आणखी दोन आरोपींना अटक केली केली असून, त्यांना न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे गोळीबार करणाऱ्या आरोपीला मदत करणाऱ्यांची संख्या आता पाचवर गेली असून, त्यात चार जणांना नांदेड येथे तर एकाला पंजाब येथून अटक करण्यात आलेली आहे.
१० फेब्रुवारी रोजी शहीदपूरा भागात सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला होता. या गोळीबारात गुरमितसिंग सेवादार आणि रविंद्रसिंग राठोड हे दोघे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता, उपचारादरम्यान रविंद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाला होता. नांदेड पोलिसांना हवा असलेल्या बब्बर खालसा संघटनेचा हरविंदरसिंघ उर्फ रिंधा याचा भाऊ सत्येंद्रसिंग उर्फ सत्या याचा खून केल्याप्रकरणी गुरमितसिंघ सेवादार यास जन्मठेपेची शिक्षा झाली.
तो पॅरोल रजेवर आल्यानंतर सराईत आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मित्र रविंद्रसिंग राठोड हा मृत पावला. वजिराबाद पोलिसांनी हल्लेखोराला मदत करणाऱ्या मनप्रितसिंग उर्फ मन्नू गुरुबक्षसिंग ढिल्लो आणि हरप्रितसिंग उर्फ हॅप्पी बाबूसिंग कारपेंटर या दोघांना अटक केली. त्यानंतर हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला.





