स्वस्त सोन्याच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक; दोघांना अटक, दोन फरार

कापूरव्होळ (ता. भोर) : स्वस्त दरात सोनं मिळवून देण्याच्या बहाण्याने सांगली येथील एका व्यक्तीची तब्बल 10 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 4 ऑगस्ट रोजी भोर तालुक्यातील कापूरव्होळ परिसरात घडली. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन जण फरार आहेत.
फिर्यादी जयकुमार बाबासो नरदेकर (वय 47, रा. मिरज, जि. सांगली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कृष्णा प्रकाश तुपे (रा. वडजल, ता. माण, जि. सातारा), राहुल चव्हाण (रा. वराडे, ता. कराड), बुवा ठाकूर (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नरदेकर हे खाजगी कंपनीत नोकरीला असून, त्यांची आरोपी तुपेशी यापूर्वी ओळख झाली होती.
कशी झाली फसवणूक?
तुपेने नरदेकर यांना “30 हजार रुपये प्रति तोळा दराने सोनं मिळवून देतो” असे आमिष दाखवले. यासाठी त्यांना 16 जुलै रोजी मध्य प्रदेशातील कटणी येथे नेले. तिथे ‘बुवा ठाकूर’ नावाच्या व्यक्तीने सोनं विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. सॅम्पल म्हणून दिलेले एक ग्रॅम सोनं खरे असल्याचे दिसल्याने नरदेकर यांचा विश्वास बसला. त्यानंतर तुपेने सतत फोनवर संपर्क साधून डील पक्की करण्यासाठी दबाव टाकला.
2 ऑगस्ट रोजी नरदेकर यांनी 10 लाख 50 हजार रुपयांचे सोनं घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगलीत डिलिव्हरीची मागणी केली, पण ‘बुवा’ने पुण्यात येण्यास सांगितले. 4 ऑगस्ट रोजी नरदेकर आणि त्यांचे दोन मित्र पैसे घेऊन पुण्याकडे निघाले. शिरवळजवळ तुपेने त्यांना कापूरव्होळ येथील पुलाखाली बोलावले. तिथे तुपे आणि चव्हाण यांची भेट झाली. त्यानंतर भोरच्या दिशेने तीन किलोमीटर अंतरावर ‘बुवा ठाकूर’ भेटला. त्याने पैसे घेऊन “सोनं आणतो” असे सांगत शेतात निघून गेला, पण तो परतलाच नाही.
पोलिसांत तक्रार, दोघांना अटक
फसवणूक झाल्याचा संशय येताच नरदेकर यांनी तुपेला जाब विचारला, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शोधाशोध केल्यानंतर ‘बुवा’ सापडला नाही. नरदेकर यांनी प्रसंगावधान राखत तुपे आणि चव्हाण यांना ताब्यात घेतले. पोलिसांत जाण्याची धमकी दिल्यावर तुपेने त्रास होण्याची भीती दाखवली, पण नरदेकर यांनी दोघांना राजगड पोलीस ठाण्यात आणले. सध्या तुपे आणि चव्हाण यांना 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर ‘बुवा ठाकूर’ आणि त्याचा एक साथीदार फरार आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार नाना मदने करत असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. स्वस्त सोन्याच्या नावाखाली अशा फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




