Pune Crime : शिवाजी रोडवर तरुणांकडून एम.डी. ड्रग्ज अन् कोयता जप्त; दोघे अटकेत

पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्रीच्या सापळ्यात दोन तरुणांना ताब्यात घेत १ लाख २३ हजार ६०० रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आणि एक लोखंडी कोयता जप्त केला आहे. या कारवाईत अब्दुल अकबर खान (वय १९, रा. दत्त मंदिराजवळ, लेन नं. २१, पर्वती दत्तवाडी, पुणे) आणि धीरज ऊर्फ गुड्डु निलेश कदम (वय १९, रा. जनता वसाहत, गल्ली नं.११, डोंगर भाग, दत्तवाडी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस शिपाई आशिष अदिनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ ऑक्टोबरच्या रात्री ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मनोजकुमार लांडे, उपनिरीक्षक कावडे, बोराडे, तसेच इतर स्टाफसह गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.
रात्रीच्या सुमारास शिवाजी रोडवरील स्वामी मंदिराजवळ दोन संशयास्पद इसम दिसल्याने पोलिसांनी त्यांना थांबवले. चौकशीदरम्यान अब्दुल खानच्या पॅन्टच्या खिशात असलेल्या झिप लॉक पिशवीतून ६.१८ ग्रॅम एम.डी. पावडर आढळून आली. तर त्याच्या साथीदार धीरज कदमच्या पॅन्टच्या कंबरेतून एक लोखंडी कोयता मिळून आला.
सदर अंमली पदार्थाचे वजन आणि पंचनामा पोलीस निरीक्षक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांच्या उपस्थितीत करण्यात आला. एम.डी. पावडरची एकूण किंमत ₹१,२३,६००/- असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये कलम २२(व), २९ तसेच शस्त्र कायदा कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत बोराडे करत आहेत.





