पिंपरी | लुकलूकणाऱ्या काजव्यांची आकाशातील ताऱ्यांशी स्पर्धा

लोणावळा, {विशाल पाडळे} – सध्या काजव्यांचा मोसम सुरू आहे. मावळ परिसरातील तसेच लोणावळ्याच्या आजूबाजूच्या जंगलात हे काजवे रात्रीच्या वेळी लुकलुक करीत निसर्गाच्या सौन्दर्यात भर घालीत आहेत. त्यामुळे हे लुकलूकणारे काजवे बघण्यासाठी हौशी ट्रेकर्स तसेच काजवाप्रेमी या अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत.
लोणावळ्याच्या जवळ असणाऱ्या राजमाची या ठिकाणी काजव्यांचे थवच्याेथवे दिसू लागले आहेत. त्यामुळे राजमाचीच्या जंगलात सध्या या काजवाप्रेमीची जत्राच भरत आहे.
लोणावळ्यापासून काही अंतरावर असलेल्या डेला अडव्हेंचरच्या पुढे राजमाची रस्त्याने गेल्यास उजव्या हाताला पटेल डॅम म्हणून एक छोटे धरण लागते. या धरणाच्या परिसरात काही प्रमाणात काजवे आढळून येतात. पण पुढे राजमाची किल्ला परिसरातील गावात गेल्यावर त्याठिकाणच्या जंगलातही मोठ्या संख्येने काजवे बघायला मिळतात.
काजव्यांच्या दोन हजार प्रजाती
काजवा हा असा एकच जीव आहे की जो स्वयं प्रकाशमान आहे. जगभरात वैज्ञानिकांस काजव्यांच्या 2000 पेक्षा जास्त प्रजाती आजतागायत सापडल्या आहेत. समागमानंतर काही दिवसांनी, मादी काजवा अंडी घालते. 3 ते 4 आठवड्यात, या अंड्यांमधुन अळी बाहेर येतात.
या अळ्या म्हणजेच भविष्यातील काजवे. एखाद्या अळईचे काजव्यामध्ये रुपांतर झाल्यावर मात्र काजवे पाने फुले फुलातील परागकण इत्यादी खातात. पण सगळेच काजवे असेच काहीतरी खातात असे नाही. काही प्रौढ मादी काजवे चक्क दुसर्या प्रजातीच्या नर काजव्यांना देखील गट्टम करतात.
येथे पाहता येतील काजवे
पाऊस पडायला सुरुवात झाली की ते सर्व नाहीसे होतात. आपण जर कधी मे महिन्याच्या शेवटास किंवा जुनच्या पहिल्या आठवड्यात ट्रेक ला गेलो असेल तर आपण लाखोंच्या संख्येने काजवे चमकताना पाहिलेले आठवत असेल. पण हे काजवे जुनच्या मध्यानंतर नाहिसे होतात.
काजवे पाहण्यासाठी अंधारात तास दोन तास चालण्याची तयारी असायला हवी. लोणावळाच्या आजूबाजूचे जंगल, राजमाची, मुळशी, भांबर्डे गाव, घनगड किल्ला जंगल परीसर इ ठिकाणी काजवे नक्की आढळतात. त्या व्यतिरिक्त पवन मावळात तुंग किल्ला परीसर या ठिकाणी काजवे पाहता येतील.
सावधगिरी बाळगा
काजवे पहायला जायचे म्हणजे ज्या परीसरात जाणार आहात त्या परीसरातील खडा-न-खडा माहिती असणे आवश्यक आहे. किंवा कोणी माहितगार सोबत असणे गरजेचे आहे. कारण भटकंती अंधारातच करावी लागते. साधारणतः रात्री 8 वाजल्यापासून रात्री 11.30 पर्यंत हे काजवे फार उत्तम प्रकारे बघता येतात. त्यानंतर मात्र त्यांचे लुकलूकने कमीकमी होत जाते.





