राज्यात चोवीस तासात 187 नवे रूग्ण

208 करोनाबाधित रुग्ण घरी परतले
राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1761
मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी करोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. राज्यात आज करोना बाधित 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1761 पोहोचली आहे. तर करोनाबाधित 208 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज 17 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 127 झाली आहे.
आज झालेल्या मृत्यांपैकी मुंबईचे 12, पुण्यातील 2, तर सातारा, धुळे आणि मालेगाव येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष, तर 6 महिला आहेत. तसेच मृत्यूंपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 17 पैकी 16 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरो अशा स्वरुपाचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांना क्षयरोगही होता.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 36 हजार 771 नमुन्यांपैकी 34 हजार 94 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1761 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 38 हजार 800 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4964 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण 4641 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.





