COVID-19 cases : राज्यात कोविड-१९चा प्रसार २०२५ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्याहून अधिक कमी झाला असला, तरी मृत्यूंच्या आकड्यात किरकोळ वाढ झाल्याची माहिती महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी विधानसभेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री अबिटकर म्हणाले की, जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत कोविड-१९मुळे ३५ मृत्यू झाले, तर २०२५ च्या त्याच कालावधीत हा आकडा ४६ वर पोहोचला. याच आजाराच्या संसर्गाच्या बाबतीत निम्ञाने प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी जानेवारी–ऑक्टोबर या कालावधीमध्ये 5524 तर यावर्षी याच कालावधीमध्ये 2781 प्रकरणांची नोंद करन्यात आली असल्याचे मंत्री अबिटकर यांनी स्पष्ट केले. तीन वर्षांत १४,५२६ बालमृत्यू : महाराष्ट्रातील सात प्रमुख जिल्ह्यांत गेल्या तीन वर्षांत १४,५२६ बालमृत्यू नोंदले गेल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी विधानसभेत दिली. आबिटकर यांच्या मते, २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांत एकूण १४,५२६ बालमृत्यू नोंदले गेले. या आकडेवारीत पाच वर्षांखालील अर्भक आणि मुलांचे मृत्यू तसेच गंभीर कुपोषणाशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातही १३८ बालमृत्यू नोंदले गेल्याचे त्यांनी सांगितले.