पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यात मुंबई आणि पुणे महापालिका क्षेत्रात प्रत्येकी ३४ रुग्ण आढळले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १०, तर पुणे ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत. ही आकडेवारी चिंतेची असून, सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होते. राज्यातील कोरोना आकडेवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १ जानेवारी ते ५ जूनदरम्यान १४,५६५ चाचण्या करण्यात आल्या असून, १,१६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात ५४८ सक्रिय रुग्ण आहेत, तर ५९७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १६ जणांना गंभीर सहव्याधी होत्या. मुंबई-पुणे हॉटस्पॉटच्या दिशेने! मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक ५७५ रुग्णांची नोंद, तर आता पुणेही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चर्चेत आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण परिसरातही नवीन रुग्ण सापडल्याने पुणे जिल्ह्यातील एकूण धोका वाढतोय. लक्षणे सौम्य, पण दक्षतेचा सल्ला सध्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळत असून, रुग्णालयात दाखल होण्याची गरज कमी भासते. मात्र नागरिकांनी सजग राहून मास्क, सॅनिटायझर, आणि सामाजिक अंतराचे पालन करावे,’ असा सल्ला आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिला आहे. कोणत्या भागांत किती रुग्ण? मुंबई महापालिका – ३४ पुणे महापालिका – ३४ पिंपरी-चिंचवड महापालिका – १० पुणे ग्रामीण – ४ ठाणे – ४ सांगली व छत्रपती संभाजीनगर महापालिका – प्रत्येकी ३ कल्याण – २ वसई-विरार, सातारा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर – प्रत्येकी १