Rajmata Jijau Bus : शिवशाही आणि शिवनेरी बससेवेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाकडून राज्यात नवीन बससेवा सुरू होणार आहे. या नवीन एसटी बसला राजमाता जिजाऊ असे नाव दिले आहे. यापूर्वीच्या एसटी बसपेक्षा ही बस अत्याधुनिक असणार आहे. या बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ मार्च २०२६ रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. या बससेवेची घोषणा फेब्रुवारीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. आता या लोकार्पण सोहळ्यानंतर या सेवेला हिरवा कंदील मिळणार आहे. तसेच, महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 3,000 राजमाता जिजाऊ या स्मार्ट बस दाखल होणार आहेत. ही बस सर्वात आधी गर्दीच्या मार्गांवर धावणार आहेत. ही सेवा सर्वात पहिली नागपूरमध्ये सुरू होणार असून पहिल्यांदा 50 बस शहरात दाखल होतील. राजमाता जिजाऊ बस सेवेमुळे बसच्या संख्येत वाढ होणार आहे. या बसेस आधीपेक्षा आधुनिक असल्यामुळे प्रवासही वेगवान आणि अधिक सुरक्षित होणार आहे. या बसची आसन क्षमता 40 आहे. या नविन बसेस स्मार्ट असतील. दोन प्रमुख शहरांदरम्यान शटल सेवेसारख्या या बसेस चालवल्या जातील. लवकरच या बसेसेवेचा विस्तार नागपूरहून इतर शहरांतही करण्यात येणार आहे.