पुणे जिल्हा | तुकोबांच्या पालखीने केला अवघड रोटी घाट पार

यवत, {मनोज खंडाळे) – हिरवाईने नटलेल्या नागमोडी वळणाच्या रोटी घाटात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवार (दि.५) दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास दाखल झाला. एकच्या सुमारास पालखी सोहळ्याची जादाच्या तीन बैलजोडयांनी एकूण सहा बैलांची मदत घेऊन रोटी घाट पार केला.
रोटी घाटात टाळ- मृदंगात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माऊली माऊली माऊलीच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या जयघोष करीत अवघा घाट दुमदुमून गेला होता. घाट सर करीत असतानाचे मनमोहक दृश्य अनेकांनी आपल्या डोळ्यांनी व मोबाईल कॅमेराने टिपले.
पालखी सोहळा रोटी (ता.दौंड) येथे अभंग आरती करीत हिंगणीगाडामार्गे वासुंदे (ता.दौंड) येथून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे रात्री आठच्या दरम्यान मुक्कामासाठी पोहोचला वरवंड (ता. दौंड) ते उंडवडी (ता. बारामती) हा २६ किलोमीटरचा सर्वांत मोठा टप्पा व अवघड वळणाचा घाट पार करण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पाटस (ता. दौंड) येथील भागवतवाडी १५ मिनिटांची विश्रांती घेण्यासाठी आगमन होताच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मात्र पालखी सोहळ्याचे आगमन गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होत असताना पाटसकरांनी सोहळ्याचे स्वागत केले.
वरवंड येथे गुरुवार (दि.४) तालुक्यातील दुसऱ्या दिवशी मुक्कामी असणारा व तालुकवासीयांना निरोप देण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवार (दि.५) पहाटेची आरती घेऊन पाटस दिशेने मार्गस्थ झाला.
हा पालखी सोहळा सकाळी ९ वाजता पाटस हद्दीत दाखल झाला. त्याचक्षणी पालखी सोहळ्याचे पाटस ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले. ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीने प्रवेश केल्यावर भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते.
पाटस येथील श्री नागेश्वर मंदिरातील दुपारचा विसावा घेऊन पालखी सोहळ्याला नागमोडी वळणाचा अवघड ठरणारा रोटी घाट पार करण्यासाठी सर्व भाविकांना व वैष्णवांसाठी पाटस गावाकडून नेहमीप्रमाणेच गोड जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे भाविकांनी व वारकऱ्यांनी पाटसकरांचे भरभरून कौतुक केले.
तालुकावासीयांना निरोप देण्यासाठी बारामती तालुक्यात उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पुढील मुक्कामासाठी पालखी सोहळा १२ वाजता मंदिराबाहेर निघत घाट मार्गाकडे मार्गस्थ झाला होता.
ऐतिहासिक असलेला रोटी घाट पालखी मार्गाच्या चौपदरी कामात नाहीसा झाला आहे. मात्र नव्याने तयार झालेला रोटी घाट परिसरात यंदा पावसाने आगोदरच हजेरी लावल्याने परिसर हिरवाईने नटाला आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळाला घाट पार करण्यासाठी बैलजोड्यांची मदत घ्यावी लागतच आहे.
त्यामुळे घाटातील वातावरण पूर्वी प्रमाणेच दिसत आहे. मात्र घाटातील पालखीदृश्य पाहण्यासाठी तालुकासह व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कौठा, सिद्धटेक, राशीनसह इंदापूर, बारामती, शिरूर, हवेली, पुरंदर तालुक्यासह बाहेरील नागरिकानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
सहा बैलजोड्यांनी घाट पार
रोटी घाट पार करण्यासाठी यंदा मात्र सालाबादप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला जादाच्या आठ बैलजोड्याची एकूण मिळून १६ बैलांची मदत घ्यावी लागली नाही, तर यंदा पालखी रथाच्या पाच बैलजोड्या कमी करून तीन बैलजोड्या जादा लावून एकूण ६ बैलांच्या मदतीने पालखी रथाला रोटी घाटातून वर नेत घाट पार केला.
गवळ्याची उंडवडीत मुक्काम
दौंड तालुक्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या सहवासाने तालुक्यात भक्तिमय वातावरण करून तालुक्यातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा रोटीच्या नागमोडी वळण घाट पार करून हा पालखी सोहळा रोटी (ता.दौंड) येथे अभंग आरती करीत हिंगणीगाडामार्गे वासुंदे (ता.दौंड) येथून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे रात्री आठच्या दरम्यान मुक्कामासाठी पोहचला आहे.





