DJ Ban in Village: डीजेवर घातली कायमची बंदी! दौंडमधील ‘या’ गावाने घेतला धाडसी निर्णय

प्रभात वृत्तसेवा
यवत – दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावामध्ये डीजे बंदीचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवार, दि.२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत हा डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.सध्या सगळीकडे लग्नसराईची लगबग सुरू आहे. त्यामुळे देवाच्या दर्शनासाठी डीजेची मिरवणूक काढण्याची एक अनोखी प्रथा सध्या ग्रामीण भागात देखील वाढू लागली आहे.
यामध्ये गावातील नववधू किंवा नवरदेव यांच्यासोबत युवक पाहुणेमंडळी हे देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. त्यानंतर पुन्हा लग्न लागून गावात नववधु वा नवरदेव आले असता त्यांच्या स्वागतासाठी देखील मोठमोठे डीजेचे थर लावलेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे एका मिरवणुकीसाठी दोन दोन डीजेमध्ये स्पर्धा लावलेली देखील पाहायला मिळतं आहे.
यावेळी या दोघांच्या चढाओढीच्या स्पर्धेत आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडत ‘डीजे’वाले डीजे लावत असतात. जास्तीत जास्त मोठ्या आवाजाची स्पर्धा लागल्या जातात मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांना या आवाजाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या डीजेच्या आवाजावर तरुणाई थिरकते. मात्र, त्यामुळे तरुण वर्गात देखील मोठ्या प्रमाणात व्यसनाचे प्रमाण वाढले असल्याचे सध्याचे चित्र आहे.
या कर्णकर्कश आवाजाचा परिणामामुळे बहिरेपण, हृदयविकाराचा धक्का यांच्यासारख्या घटना घडत आहे. त्यामुळे डीजे बंदी व्हावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या मागणीवरून ‘डीजेवरील बंदी’ हा विषय प्रामुख्याने घेण्यात आला व ‘डीजे’ वर बंदी घालण्यात यावी, असे मत ग्रामस्थांनी माडली असल्याने सर्व ग्रामस्थांच्या मागणीमुळे डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला.
शोकसभेतील भाषणावरही मर्यादा?
त्याचप्रमाणे गावामध्ये सध्या शोक सभेत मोठ्या प्रमाणात भाषणे होत असून बाकीच्या गावात या भाषणावर मर्यादा आणल्या आहेत. त्याच गावांचा आदर्श आपल्या गावाने घेऊन शोकसभेत होणारी भाषणे यांच्यावर देखील मर्यादा घालण्याचा देखील ठराव करून घ्यावा, असे मत महेश नातू यांनी मांडले.
या ठरावाच्या निर्णयाची प्रत तहसीलदार दौंड, गटविकास अधिकारी दौंड तसेच यवत पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार आहे आणि तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी अश्या स्वरूपाचा निर्णय घेऊन एक नवा आदर्श घालून द्यावा, असे देखील मत जेष्ठ नागरिकांनी मांडले. यावेळी ग्रामसेभेस ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





