Daund Rain : दौंडमध्ये निसर्गाचं तांडव! वीज कोसळली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; मेंढपाळाचं अतोनात नुकसान
Daund Rain : अवकाळी पावसामुळे गव्हापासून द्राक्षापर्यंत सर्वच पिकांचे नुकसान; पिकांनंतर आता पशुधनावरही काळाचा घाला, दौंडमधील शेतकरी हवालदिल.

Daund Rain – अवकाळी पावसाने दौंड तालुक्यातील काही गावात थैमान घातले आहे. यामध्ये शेतकऱ्यांसह मेंढापाळ यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. मागास असणारा गहू,कांदा,द्राक्ष,कलिंगड यांचबरोबर तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्याबरोबर मेंढापाळ यांच्या पशुधनावर वीज कोसळून गाई वासरू आणि एक बोकड याचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दौंड तालुक्यातील यवत येथील स्टेशन हद्दीत दुधाने चौकात शेतात वस्ती असणाऱ्या मेंढपाळाच्या एक गाई वासरू आणि बोकड यावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (दि.०३) रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये मेंढापाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेचा प्रभाव एवढ्या तीव्रतेचा होता की, मेंढापाळ बाबू आप्पा पिंगळे (रा.भांडगाव ता.दौंड) यांच्या कुटुंबातील चार जण देखील बेशुद्ध अवस्थेत पडले होते. मात्र, सुदैवाने त्यांना काहीही झाले नसून त्यांची प्रकृती ठीक आहे.
यामध्ये मात्र त्यांचे पशुधनाचे फार मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे मेंढपाळ आणि शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे गेला असल्याने शेतकरी आणि मेंढापाळ हवालदिल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ज़िल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे,पंचायत समिती सदस्य तेजस्विनी पडळकर,
महसूल विभागाच्या तलाठी मीनाक्षी सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामा करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य यांनी मेंढपाळ बाबू पिंगळे यांचे पशुधनाचे झालेल्या नुकसानीबाबत त्यांना धीर देत प्रशासकीय पातळीवर सर्व ती मदत शासकीय विभागाकडून व आमच्याकडून केली जाईल, असे आश्वासित केले.
चौघे बेशुद्ध आणि कुटुंब वाचले…
बाबू पिंगळे दौंड तालुक्यातील भांडगाव येथील मेंढपाळ आहेत. ते दिवसभर आपल्या मेंढ्या जवळपास असणाऱ्या परिसरातील गावातील शेतकरी व जिथे चारा उपलब्ध होईल तिथे ते मेंढ्या चारत असून आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र, काल अचानक आलेल्या पावसामुळे आपल्या मेंढ्या वाड्यावर घेऊन आले असताना अचानक वीज पडल्याने पिंगळे कुटुंबातील चौघे बेशुद्ध पडले होते. वीज गाई वासरू आणि बोकड यांच्यावर पडल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया पिंगळे कुटुंबीयांनी दिली.




