Pune News : महाराष्ट्रातील जिओची दशकभराची दमदार वाटचाल; ग्राहकसंख्येत 45.5 पट वाढ
गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या मोबाईल बाजारपेठेत मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन झाले आहे. जिओच्या वेगवान विस्तारासोबतच राज्यातील एकूण वायरलेस कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली.

Pune News – रिलायन्स जिओने महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर म्हणून आपले स्थान भक्कम केले असून, गेल्या दशकभरात केलेल्या उल्लेखनीय विस्तारामुळे राज्याच्या दूरसंचार क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे. महाराष्ट्रातील जिओच्या प्रवासाची सुरुवात सप्टेंबर 2016 मध्ये अवघ्या 9.8 लाख ग्राहकांपासून झाली.
जून 2026 पर्यंत जिओची ग्राहकसंख्या तब्बल 444.8 लाख अर्थात सुमारे 4.45 कोटी झाली. म्हणजेच अवघ्या दहा वर्षांत जिओच्या ग्राहकसंख्येत तब्बल 45.5 पट वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या वायरलेस बाजारपेठेत 42.7% बाजारहिस्सा मिळवत जिओ आज राज्यातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर ठरला आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2016 ते जून 2026 या कालावधीत जिओने निव्वळ 435.1 लाख नवीन ग्राहक जोडले. या कालावधीत जिओच्या ग्राहकसंख्येत 47.9% च्या CAGR दराने वाढ झाली, जी इतर प्रमुख ऑपरेटरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. याच कालावधीत एअरटेलची CAGR 9.8% राहिली, तर व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत घट झाली.
अवघ्या दोन वर्षांत जिओने एअरटेलला मागे टाकले :
जिओच्या वेगवान विस्तारामुळे महाराष्ट्रातील दूरसंचार बाजारपेठेतील स्पर्धात्मक समीकरणांमध्ये मोठा बदल झाला. बाजारात प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, ऑगस्ट 2018 मध्ये जिओने एअरटेलला मागे टाकले. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये जिओ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर बनला आणि तेव्हापासून त्याने राज्यातील क्रमांक 1 चे स्थान कायम राखले आहे.
जिओच्या वाढीसोबत महाराष्ट्रातील एकूण बाजारपेठेचाही विस्तार :
जिओची वाढ केवळ इतर ऑपरेटरकडून ग्राहक मिळवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. गेल्या दशकात महाराष्ट्रातील एकूण वायरलेस बाजारपेठेतही लक्षणीय विस्तार झाला आहे.
राज्यातील एकूण वायरलेस ग्राहकसंख्या सप्टेंबर 2016 मधील 849.7 लाखांवरून जून 2026 मध्ये 1,041.5 लाखांवर पोहोचली. म्हणजेच या कालावधीत एकूण वायरलेस ग्राहकसंख्येत 22.6% वाढ झाली.
या दशकात दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरणही झाले. 2016 मध्ये महाराष्ट्रातील बाजार पेठे पेक्षा अधिक ऑपरेटर कार्यरत होते. त्यानंतर दूरसंचार बाजारपेठेचे स्वरूप बदलत जाऊन आज ती प्रामुख्याने चार प्रमुख ऑपरेटरभोवती केंद्रित झाली आहे. ‘इतर’ (Others) या श्रेणीतील ग्राहकसंख्या ऑगस्ट 2016 मधील 216.5 लाखांवरून जुलै 2019 पर्यंत शून्यावर आली.
जून 2026 मधील महाराष्ट्राची वायरलेस बाजारपेठ :
जून 2026 अखेर महाराष्ट्रात एकूण 1,041.5 लाख वायरलेस कनेक्शन्स होती. त्यामध्ये जिओचा सर्वाधिक वाटा होता.
ऑपरेटर ग्राहकसंख्या (लाख)
जिओ 444.8
एअरटेल 337.4
व्होडाफोन आयडिया 206.4
बीएसएनएल 52.9
एकूण 1,041.5
सप्टेंबर 2016 मधील 9.8 लाख ग्राहकांपासून जून 2026 मधील 444.8 लाख ग्राहकांपर्यंतची जिओची झेप ही महाराष्ट्रातील दूरसंचार क्षेत्रातील सर्वात वेगवान विस्तारांपैकी एक आहे.
गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या मोबाईल बाजारपेठेत मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन झाले आहे. जिओच्या वेगवान विस्तारासोबतच राज्यातील एकूण वायरलेस कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली असून, आघाडीच्या दूरसंचार ऑपरेटरभोवती बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाले आहे.
TRAI च्या आकडेवारीतून प्रतिबिंबित होणारा जिओचा दशकभराचा प्रवास महाराष्ट्राच्या दूरसंचार क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाचा वेग आणि व्यापकता अधोरेखित करतो.





