FDA Action : तुकाराम मुंढेंचा जबर दणका; तब्बल 1.13 कोटींचा गुटखा जप्त, महाराष्ट्रात खळबळ
FDA Action : वाशिम जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा माफियांवर आणि भेसळखोरांवर आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे.

FDA Action : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली वाशिम जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि भेसळखोरांविरोधात मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 1 कोटी 13 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. (FDA Action)
एफडीएने विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 12 ठिकाणी छापे टाकले. कारंजा येथे सर्वाधिक, म्हणजेच 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा, तर रिसोड येथे सुमारे 5 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. (FDA Action)
भेसळखोरांवरही बडगा
गुटखा कारवाईसोबतच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवरही एफडीएने मोठी मोहीम राबवली. जिल्ह्यातील हॉटेल्स, डेअरी आणि मिठाईच्या दुकानांची तपासणी करून खवा, तूप, दही, पनीर यांसारख्या खाद्यपदार्थांचे 72 नमुने जप्त करण्यात आले. सुमारे 2 लाख 2 हजार रुपयांच्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. (FDA Action)
अहवालानंतर कठोर कारवाईचा इशारा
वाशिम अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त भाऊराव चव्हाण यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांचे नमुने भेसळयुक्त आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. (FDA Action)
एफडीएच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेते आणि भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळातही अशीच कठोर मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (FDA Action)






