Tukaram Mundhe : FDA आयुक्त तुकाराम मुंढे अडचणीत? 29 कर्मचाऱ्यांचे गंभीर आरोप, मंत्र्यांकडे लेखी तक्रार
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील FDA प्रयोगशाळेतील 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्ट आणि सुट्टीच्या दिवशी कामावर आक्षेप.

Tukaram Mundhe : अन्न भेसळविरोधी मोहिमा आणि धडक कारवायांमुळे राज्यभर चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासमोर आता विभागातील अंतर्गत नाराजीचे आव्हान उभे राहिले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर आक्षेप नोंदवत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना आवश्यक कर्मचारी, तांत्रिक सुविधा, आधुनिक उपकरणे आणि इतर संसाधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, विद्यमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रयोगशाळेतील कामकाजाची वेळ मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेकांना सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत, काही वेळा मध्यरात्रीपर्यंत काम करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि काम-जीवन समतोलावर प्रतिकूल परिणाम होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नमुन्यांच्या तपासणीवर घाईचा दबाव असल्याचा आरोप –
निवेदनात प्रयोगशाळेतील तपासणी प्रक्रियेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अन्नपदार्थ, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचे प्रलंबित नमुने लवकर निकाली काढण्यासाठी विश्लेषकांवर अतिरिक्त दबाव टाकला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
भारतीय औषध संहिता (IP), ब्रिटिश फार्माकोपिया (BP) आणि युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया (USP) यांसारख्या मान्यताप्राप्त मानकांनुसार नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी पुरेसा कालावधी आवश्यक असतो. मात्र, अल्पावधीत अहवाल पूर्ण करण्याच्या दबावामुळे तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
सुविधा आणि मनुष्यबळ अपुरे असल्याचा दावा –
प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी वाढीव कामकाजाच्या तुलनेत आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक उपकरणे, तांत्रिक सहाय्यक आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत दोन शिफ्टमध्ये काम सुरू केल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
29 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन –
या निवेदनावर प्रयोगशाळेतील सहसंचालकांसह एकूण 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्याही मांडल्या आहेत.
त्यामध्ये अचानक सुरू करण्यात आलेली दोन शिफ्टची पद्धत रद्द करून पूर्वीची कार्यालयीन वेळ लागू करणे, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी काम करण्याची सक्ती थांबवणे, रिक्त पदे तातडीने भरून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे, अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते व सुविधा देणे तसेच नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, यासाठी आवश्यक वेळ आणि संसाधने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष –
या तक्रारीमुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील कामकाज आणि व्यवस्थापनाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या निवेदनावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ किंवा विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सरकार या तक्रारीची दखल घेऊन काय भूमिका घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





