Trump vs Khamenei : खामेनींवरील कारवाई विरुद्ध इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

Trump vs Khamenei – इराणचे सर्वोच्च नेते आयोतोल्ला अली खामेनी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, असा इशारा इराणने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे. खामेनी यांची ४० वर्षांपासूनची राजवटसमाप्त करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी इराणी जनतेला केले होते. त्यावर इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते जनरल अबोलफझल शेखरची यांनी हा इशारा दिला आहे.
खामेनी हे आजारी व्यक्ती असून त्यांनी आपल्या देशाचा कारभार योग्यरितीने करायला हवा. आपल्याच देशातील लोकांना मारणे थांबवायला हवे, असे ट्रम्प एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते. इराणला आता नवीन नेतृत्वाची गरज आहे, असेही ट्रम्प म्हणाले होते.
इराणमध्ये हालाखीच्या आर्थिक स्थितीवरून २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या आंदोलनावर कठोर कारवाई सुरू झाल्यापासून अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्यांची हत्या आणि आंदोलकांना सामुहिक फाशी न देण्याविषयीचा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.
सशस्त्र संघर्षाचे वारे
अमेरिकेच्या नौदलातील यूएसएस अब्राहिम लिंकन ही विमानवाहू युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात तैनात असून मलाक्का खाडीतून पुढे सरकली आहे. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिका देखील पश्चिमेच्या दिशेने हिंद महासागराच्या दिशेने सरकत आहेत.
याचा अर्थ हे नाविक दल अल्पावधीतच इराणच्या जवळ पोचतील. यूएसएस अब्राहिम लिंकन हे जहाज यापुर्वीही २०२४ मध्ये मध्यपूर्वेच्या दिशेने वळवले गेले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये यूएसएस निमित्झ देखील या भागाकडे वळवण्यात आले होते.
इराणमधील मृतांचा आकडा ४,५१९ वर
दरम्यान इराणमधील हिंसक आंदोलनात मरण पावणाऱ्यांची संख्या आता ४,५१९ वर पोचली आहे, असे अमेरिकास्थित ह्युमन राईटस ऍक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीने म्हटले आहे. पण इराणमधील इंटरनेट खंडीत असल्याने या आकडेवारीची त्रस्थ वृत्तसंस्थेकडून पडताळणी करता येऊ शकलेली नाही.
मृतांचा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता असून इराणने ही आकडेवारी कमी भासवली असल्याचे बोलले जाते आहे. आतापर्यंत २६,३०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी काही जणांना इराणकडून सामुहिक फाशी देण्याची तयारी झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.





