Trump tours Texas flood : डोनाल्ड ट्रम्प यांनी केली पूरग्रस्त टेक्सासची पहाणी

केरविले (टेक्सास) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पूरग्रस्त टेक्सास प्रांताचा दौरा केला आणि तेथील पूरस्थितीचा आढावा घेतला. ट्रम्प यांनी पूरानंतर मदत आणि बचाव कार्य कणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील केले. पूराचा इशारा का दिला गेला नव्हता, असे प्रश्न वारंवार विचारले जात असताना देखील ट्रम्प यांनी प्रशासनाने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
ट्रम्प यांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी काटकसरीच्या नवीन उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेलाही कमी करण्याची आपली तयारी असल्याचे ट्रम्प यांनी वारंवार बोलून दाखवले आहे.
मात्र अशा प्रकारची आपत्ती आली असता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सी कार्यरत नसती, तर काय झाले असते, या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणे टाळले. स्वतः फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनीच ही शंका उपस्थित केली होती.
टेक्सास हे प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेले राज्य आहे. तेथील आपत्तीबद्दल ट्रम्प यांनी अगदी सहानुभूतीने सर्व चौकशी केली. पुरामध्ये बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलींचा शोध अजूनही सुरू आहे.
त्या शोधमोहिमेचा आढावाही ट्रम्प यांनी घेतला. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्कालिन मदतीच्या व्यवस्था स्थलांतरितांच्या आश्रयासाठीच्या व्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली. अन्य कोणीही करू शकले नसते, असे काम अधिकाऱ्यांनी केल्याचे ते म्हणाले.
टेक्सासमध्ये आलेल्या पुरामध्ये किमान १२० जण मरण पावले आहेत. तर १७० पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत. केर कौंटीबरोबर अन्य ८ कौंटीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावाही ट्रम्प यांनी घेतला. या ठिकाणच्या नुकसान भरपाई आणि मदतीसाठी राष्ट्रीय मदत मिळण्यास त्यांनी मान्यता दिली.





