युक्रेनची सर्व लष्करी मदत ट्रम्प यांच्याकडून स्थगित; एक अब्ज डॉलरची शस्त्रे आणि दारुगोळ्याचा पुरवठा थांबवला

Donald Trump – युक्रेनला दिली जाणारी सर्व लष्करी मदत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्पुरती स्थगित केली आहे. ओव्हल कार्यालयामध्ये झालेल्या वादावादीनंतर ट्रम्प यांनी युक्रेनची मदत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. यामुळे युक्रेनला उपलब्ध करून दिली जाणारी १ अब्ज डॉलरची शस्त्रे आणि दारुगोळा त्वरित थांबवण्यात आला आहे.
झेलेन्स्की यांच्याबरोबरच्या चर्चेत झालेल्या वादावादीनंतर ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या वरिष्ठ नेत्यांशी आणि राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित वरिष्ठ सल्लागारांशी अनेक बैठका घेतल्या आणि चर्चा केली. जोपर्यंत रशियाबरोबर शांततेसाठीच्या वाटाघाटींना युक्रेन तयारी दाखवत नाही, तोपर्यंत ट्रम्प यांचा हा आदेश लागू राहणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
युक्रेन सुरक्षितता सहाय्य प्राधान्य कार्यक्रमांतर्गत युक्रेनला दिली जाणारी शेकडो दशलक्ष डॉलरची मदत देखील स्थगित करण्यात आली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विषयक कंपन्यांकडून लष्करी हार्डवेअरची खरेदी करण्यासाठी युक्रेनला ही आर्थिक मदत दिली जाते.
मोठी लष्करी आणि आर्थिक मदत…
रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यापासून अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला ६५.९ अब्ज डॉलरच किंमतीचे लष्करी सहाय्य केले आहे. त्यापुर्वी २०१४ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते, तेंव्हाही सुरुवातीच्या काळात अमेरिकेने ६९.२ अब्ज डॉलरचे लष्करी सहाय्य युक्रेनला दिले होते.
अमेरिकेने युक्रेनला आतापर्यंत दिलेल्या मदतीच्या जोरावरच युक्रेन गेल्या तीन वर्षांपासून रशियाशी युद्ध करू शकला असल्याचा दावा ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी झेलेन्स्कींबरोबरच्या चर्चेच्यावेळी केला होता.
या मदतीबद्दल झेलेन्स्की कृतज्ञ नसल्याचा आरोप वान्स यांनी केला होता. आपण अमेरिकेचे ऋणी आहोत, मात्र सुरक्षेच्या हमीशिवाय शांतता चर्चा अशक्य असल्याचे झेलेन्स्की वारंवार म्हणाले होते.





