Donald Trump : पाक लष्कर प्रमुखांना ट्रम्प यांचे भोजनासाठी निमंत्रण

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये भोजन समारंभासाठी निमंत्रित केले आहे. व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी या भोजन समारंभाची माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता व्हाईट हाऊसमधील कॅबिनेट रूममध्ये हा भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. जी ७ परिषदेचा दौरा अर्धवट सोडून ट्रम्प मंगळवारी सकाळीच अमेरिकेला परत आले होते.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी जनरल मुनीर यांना ट्रम्प यांनी भोजनासाठी निमंत्रण दिल्याने पाकिस्तानबरोबरच्याअमेरिकेच्या संबंधांमध्ये मोठा बदल होत असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे.
जनरल मुनीर यांनी सोमवारी अमेरिकेतील पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधला. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नव्हता, या दाव्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. भारताने आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केले होते.
पण पाकिस्तानने भारताचा हा प्रयत्न ताकदीने परतवून लावल्याचा दावाही त्यांनी केला. वॉशिंग्टनमधील जॉर्जटाऊन येथील फोर सीजन्स हॉटेलमध्ये झालेल्या या वार्तालापाच्या वेळी पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून निदर्शनेही केली.
इराणला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचेही जनरल मुनीर यांनी जाहीर केले. पण तणाव कमी करण्यासाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांना पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. इस्लामिक स्टेट -खोरसान या दहशतवादी संघटनेविरोधातल्या कारवाईसाठी पाकिस्तान अमेरिकेची मदत घेत आहे.





