वॉशिंग्टन – इलॉन मस्क यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी वाद झाल्यानंतर नवीन अमेरिकन राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा काल केली होती. त्यानंतर,ट्रम्प यांना याबद्दल विचारण्यात आले होते. तिसरा पक्ष सुरू करणे हास्यास्पद आहे. रिपब्लिकन पक्षासोबत आम्हाला प्रचंड यश मिळाले आहे. डेमोक्रॅट्स त्यांचा मार्ग चुकले आहेत, परंतु ही नेहमीच द्विपक्षीय व्यवस्था राहिली आहे आणि मला वाटते की तिसरा पक्ष सुरू केल्याने गोंधळ वाढतो, असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या पाच आठवड्यांत इलॉन मस्क पूर्णपणे रुळावरून घसरलेल्या रेल्वेचा भंगार बनताना पाहून मला वाईट वाटते, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया देखील ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये दिली आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी लाखो डॉलर्स खर्च केले आणि काही काळासाठी, ते नियमितपणे व्हाईट हाऊस ओव्हल ऑफिस आणि इतरत्र अध्यक्षांच्या बाजूला दिसले. खर्चाच्या बिलावरून त्यांच्यात मतभेद झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद मस्क यांनी दुरुस्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. शुक्रवारी ट्रम्प यांनी कायद्यात स्वाक्षरी केलेल्या या उपाययोजनामुळे टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी मिळणारे हरित-ऊर्जा क्रेडिट काढून घेतले जात असल्याने मस्क नाराज असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या टीकेला उत्तर म्हणून अध्यक्ष ट्रम्प यांनी टेस्ला आणि स्पेसएक्सला सरकारी करार आणि अनुदानातून मिळणारे अब्जावधी डॉलर्स काढून घेण्याची धमकी दिली आहे.