Treesa Gayatri Medal : १५ वर्षांचा दुष्काळ संपला! त्रिशा-गायत्री जोडीचा वर्ल्ड चॅम्पियनशीमध्ये महाउलटफेर; चीनच्या जोडीला नमवून पदक केले पक्के
Treesa Gayatri Medal : या सनसनाटी विजयामुळे १५ वर्षांनंतर भारताचे स्पर्धेतील किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.

Treesa Jolly Gayatri Gopichand Create History BWF World Championships : भारताची युवा महिला दुहेरी बॅडमिंटन जोडी त्रिशा जॉली (Treesa Jolly) आणि गायत्री गोपीचंद (Gayatri Gopichand) यांनी बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद (BWF World Championships) स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. क्वार्टर फायनलच्या थरारक लढतीत बिगरमानांकित भारतीय जोडीने चीनच्या बलाढ्य जिया यी फान आणि झांग शू जियान जोडीचा १ तास ९ मिनिटांच्या संघर्षात १६-२१, २१-१५, २१-१३ असा पराभव केला. या सनसनाटी विजयामुळे १५ वर्षांनंतर भारताचे स्पर्धेतील किमान कांस्यपदक (Bronze Medal) निश्चित झाले आहे.
१५ वर्षांनंतर महिला दुहेरीत पदक; ज्वाला-अश्विनीच्या विक्रमाची बरोबरी!
भारतीय बॅडमिंटनसाठी हा विजय अत्यंत ऐतिहासिक मानला जात आहे. महिला दुहेरी प्रकारात तब्बल १५ वर्षांनंतर भारताला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळाले आहे. यापूर्वी २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या जोडीने कांस्यपदक जिंकले होते. या सामन्यापूर्वी चिनी जोडीविरुद्ध त्रिशा-गायत्रीचा रेकॉर्ड ०-३ असा पिछाडीवर होता; मात्र कोर्टवर आक्रमक खेळ दाखवत या भारतीय जोडीने तो इतिहास पूर्णपणे पुसून काढला.
पहिल्या गेममधील पराभवानंतर दुसऱ्या गेममध्ये जबरदस्त पुनरागमन!
BWF World C’ships:
“We are not stopping now, will give our 100% in semis.”
– Treesa-Gayatri after assuring medal pic.twitter.com/x5C1d5VS4F
— News Arena India (@NewsArenaIndia) August 21, 2026
पहिल्या गेममध्ये चिनी जोडीने सुरुवातीला १-६ अशी आघाडी घेत दबाव वाढवला. भारतीय जोडीने सलग ६ गुण मिळवून अंतर कमी केले, तरी चिनी जोडीने पहिला गेम २१-१६ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्येही चिनी खेळाडू ५-१ आणि १०-७ ने पुढे होत्या. मात्र, तिथून त्रिशा आणि गायत्रीने आक्रमक फ्लॅट रॅलीज आणि उत्कृष्ट नेट प्लेच्या जोरावर खेळ फिरवला. १३-१० अशी आघाडी घेत त्यांनी दुसरा गेम २१-१५ असा जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक गेममध्ये एकतर्फी वर्चस्व; चिनी भिंतीला सुरुंग!
India is assured of a medal at the #Badminton #WorldChampionships!
The unseeded pair of Gayatri Gopichand and Treesa Jolly beat the world no. 4 Chinese pair in the quarters to reach the semis of badminton’s premier event.
The young Indian duo has now won four straight matches in… pic.twitter.com/LWORtBpvc3— Rajesh Kalra (@rajeshkalra) August 21, 2026
निर्णायक तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने सुरुवातीपासूनच चिनी खेळाडूंवर तुफानी हल्ला चढवला. मध्यंतरापर्यंत ११-५ अशी मोठी आघाडी घेत त्रिशा आणि गायत्रीने पूर्ण नियंत्रण मिळवले. भारतीय आक्रमणासमोर दबावात आलेल्या चिनी खेळाडूंनी अनेक चुका (Unforced Errors) केल्या. सलग ९ मॅच पॉईंट्स मिळवत भारताने हा गेम २१-१३ असा एकतर्फी जिंकून ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.





