Tree Cutting Pune : गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला ‘ब्रेक’! महापालिका आयुक्त स्वत: घेणार सुनावणी
Tree Cutting Pune : गणेशखिंड रस्त्यावरील ५२९ झाडांवर नोटीसा; पर्यावरणप्रेमींच्या मानवी साखळीची महापालिका आयुक्तांकडून दखल.

Tree Cutting Pune – महापालिका रस्ता रूंदीकरणासाठी गणेखखिंड रस्त्यावरील ५२९ झाडे काढणार आहेत. त्याविरोधात पर्यावरण प्रेमींकडून मानवी साखळी उभारत विरोध केला आहे. त्यानंतर, याची दखल थेट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली आहे. या रस्त्यांसाठीच्या वृक्षतोडीवर आलेल्या आक्षेपांची सुनावनी आपण स्वत: घेवून निर्णय घेतला जाईल असा खुलासा राम यांनी केला आहे.
तसेच, याबाबतची सुनावणी अथवा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्यापर्यंत आलेला नाही. तसेच त्याला मान्यताही दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी विकासत्मक नियोजनाची बाजूही सर्वांनी समजून घेतली पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. गणेशखिंड रस्त्यावरील ५२९ झाडे काढण्यात येणार असून त्यासाठी, पालिकेने झाडांना क्रमांक देत त्यावर नोटीसा चिटकविल्या आहेत.
त्याला पर्यायप्रेमींनी विरोध केला आहे. तसेच मंगळवारी माजी खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नियमांवलींची माहिती नाही, त्यानंतरही वृक्ष कापणीचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर आयुक्त राम यांनी रस्त्यावरील वृक्षांच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी असतील तर स्वत: तक्रारींवर सुनावणी घेणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
तसेच शहरातील विविध विकास कामांसाठी २ हजार ५०० वृक्ष कापल्याच्या तक्रारी पर्यावरणवाद्यांनी केल्या आहेत. केवळ नदी सुधार प्रकल्पासाठी नव्हे तर पुणे मेट्रोची कामे, रस्ता रुंदीकरण आदी विकास कामांसाठी वृक्ष तोड करण्यात आलेली आहे. मात्र इतक्या प्रमाणात वृक्ष तोड केली आहे का याची तपासणी केली जाईल. तसेच नागरिकांच्या तक्रारीवर सुनावणी घेवून पुनर्रोपण केले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.




