ब्रिटनमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासी सूचना जाहीर; केंद्र सरकार सतर्क

लंडन – बांगलादेश प्रमाणेच ब्रिटनमध्ये देखील हिंसाचार सुरु आहे. देशाच्या अनेक भागातून सातत्याने हिंसक घटना समोर येत असल्याने याबाबतीत केंद्र सरकार देखील सतर्क झाले आहे. या हिंसाचाराच्या घटनांकडे भारत सरकार गांभीर्याने पाहत असल्याने आगामी काळात ब्रिटनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
लंडनमध्ये असलेल्या भारतीय उच्चायुक्तांकडून प्रवासी सूचना देण्यात आल्या आहेत. ब्रिटनमध्ये दाखल होताना भारतीय नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, ज्या ठिकाणी आंदोलन सुरु आहे त्या ठिकाणची उपस्थिती टाळावी, अशा सूचना भारतीय उच्चायुक्ताकडून देण्यात आल्या आहेत.
ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात दगडफेकीच्या घटना झाल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाक्यांद्वारे स्फोट घडविण्यात आले असून शरणार्थी राहात असलेल्या इमारतींच्या, हॉटेल्सच्या खिडक्या फोडण्यात येत आहेत. जमाव आणि पोलिसांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चकमकी घडत आहेत. त्यामुळेच ब्रिटन मध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेताना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.





