Narendra Modi Temple : तृतीयपंथी समुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारणार; काय आहे नेमकं कारण? पाहाच…
या बैठकीत मंडळाचे सदस्य राजन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ मंदिर उभारण्याचा प्रस्ताव मांडला. उपस्थित सदस्यांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Narendra Modi Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मंदिर उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर देशभरात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बिहार राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या अधिकृत बैठकीत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला असून, मोदी सरकारच्या कार्यकाळात तृतीयपंथी समुदायाला मिळालेले कायदेशीर अधिकार, सामाजिक मान्यता आणि संस्थात्मक प्रतिनिधित्व याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्रस्तावानुसार हे मंदिर बिहारची राजधानी पाटणा येथे उभारले जाणार आहे. मात्र, मंदिरासाठी जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. या निर्णयामुळे राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मोदींच्या नावाने मंदिर उभारण्याचा निर्णय का?
पाटणा येथील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात बिहार राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाची अधिकृत बैठक पार पडली. ‘तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९’ लागू झाल्यानंतर मंडळाची ही पहिली अधिकृत बैठक होती.
या बैठकीत मंडळाचे सदस्य राजन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ मंदिर उभारण्याचा प्रस्ताव मांडला. उपस्थित सदस्यांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.
प्रस्ताव मांडताना राजन सिंह यांनी सांगितले की, बिहारमधील तृतीयपंथी समाजाकडे स्वतःचे अधिकृत मंदिर किंवा सांस्कृतिक केंद्र नाही. त्यांच्या मते, २०१९ मध्ये लागू झालेल्या कायद्यामुळे तृतीयपंथी व्यक्तींना केवळ कायदेशीर संरक्षणच मिळाले नाही, तर सरकारी यंत्रणांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व वाढले, सामाजिक स्वीकारही वाढला आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला झाला. या बदलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींच्या नावाने मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०१९ च्या कायद्यामुळे काय बदलले?
केंद्र सरकारने २०१९ मध्ये ‘तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा’ लागू केला. या कायद्याचा उद्देश तृतीयपंथी व्यक्तींवरील भेदभावाला आळा घालणे, त्यांचे हक्क संरक्षित करणे आणि शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवास तसेच सामाजिक-आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या कायद्याअंतर्गत विविध राज्यांमध्ये तृतीयपंथी कल्याण मंडळांची स्थापना करण्यात आली. बिहार राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळामुळे समुदायाला राज्य प्रशासनासमोर आपले प्रश्न मांडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ मिळाले आहे.
मंदिर कुठे उभारले जाणार?
मंडळाने मंदिर उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला असला तरी त्यासाठीची जागा अद्याप निश्चित झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, हे मंदिर पाटणा शहरात उभारण्याचा मानस आहे. याबाबत पुढील प्रक्रिया आणि प्रशासनाची मंजुरी यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या घोषणेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तृतीयपंथी समाजाच्या भावना आणि कृतज्ञतेचा सन्मान केला, तर काहींनी जिवंत व्यक्तीच्या नावाने मंदिर उभारण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे हा प्रस्ताव आता सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
कटिहारमध्ये आधीच प्रतीकात्मक स्मारक
बिहारमधील कटिहार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक प्रतीकात्मक पुतळा यापूर्वीच उभारण्यात आला आहे. आता पाटण्यात मंदिर उभारण्याच्या प्रस्तावामुळे या चर्चेला आणखी वेग आला असून, पुढील काळात या प्रस्तावावर प्रशासन आणि समाजाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






