Iran strikes Kuwait : पश्चिम आशियात भीषण संघर्ष.! कुवेतमध्ये चिनी कंपनीवर इराणचा हल्ला, १ ठार
उत्तर कुवेतमध्ये एका चिनी कंपनीच्या इमारतीवर इराणने केलेल्या हल्ल्यात इमारत उद्ध्वस्त झाली असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

Iran strikes Kuwait : पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकले असून एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लष्करी कारवाया सुरु झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी उत्तर कुवेतमध्ये एका चिनी कंपनीच्या इमारतीवर इराणने केलेल्या हल्ल्यात इमारत उद्ध्वस्त झाली असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी इराणने जॉर्डनच्या दिशेने डागलेली पाच क्षेपणास्त्रे जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाडली.
जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने इराणवर मोठी प्रतिहल्ला मोहीम पूर्ण केल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कमांड सेंटर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्र सुविधांसह किनारपट्टीवरील संरक्षण तळांना लक्ष्य केले.या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, इजिप्तमधील दमिअत्ता बंदरात उभ्या असलेल्या दोन नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या जहाजांवर ड्रोन हल्ला झाला, ज्यामुळे तेथे मोठी आग लागली.
इजिप्तच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हा प्रकार ड्रोन हल्ल्यामुळेच घडल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत युद्धापासून दूर राहिलेल्या इजिप्तच्या सीमेत हा पहिलाच मोठा हल्ला ठरला आहे.
सौदी अरेबियाच्या तेल सुविधांवर सावट
इराकी संघटना आणि येमेनमधील हुथी बंडखोर सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य करत आहेत. सौदीच्या अबकैक तेल शुद्धीकरण केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. येथूनच दररोज लाखो बॅरल क्रूड ऑइलवर प्रक्रिया केली जाते.
सौदीच्या संरक्षण मंत्र्यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांची भेट घेऊन लष्करी कारवाईचे समर्थन केले, परंतु त्याच वेळी तणाव कमी करून चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी आणि बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी यांसारखे महत्त्वाचे सागरी व्यापारी मार्ग बंद झाल्यामुळे किंवा धोक्यात आल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





