France Wildfire : फ्रान्समधील वणव्याचा धोका टळला; नागरिकांना घराकडे परतण्यास परवानगी
नैऋत्य फ्रान्समध्ये लागलेल्या भीषण वणव्यानंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या ८४,००० नागरिकांना अखेर गुरुवारी प्रशासनाने घरी परतण्याची परवानगी दिली आहे.

France Wildfire – नैऋत्य फ्रान्समध्ये लागलेल्या भीषण वणव्यानंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या ८४,००० नागरिकांना अखेर गुरुवारी प्रशासनाने घरी परतण्याची परवानगी दिली आहे.
तापमान कमी झाल्यामुळे आणि हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे अग्नीशामक दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश आले आहे.
गेल्या आठवड्यापासून लागलेल्या या आगीने पॅरिस शहराच्या चारपट मोठे (सुमारे ४२,००० हेक्टर) जंगल भस्मसात केले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आतापर्यंत तब्बल २,२०,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
गुरुवारी परिसरातील तापमान ४० अंश सेल्सिअसवरून २७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून हवेतील आर्द्रता ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
हलक्या पावसामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली असून प्रशासनाने जारी केलेला ऑरेंज अलर्ट मागे घेतला आहे. सध्या २,२०० हून अधिक अग्निशामक जवान आणि २० हून अधिक विमाने अजूनही पूर्णपणे तैनात आहेत.
युरोपीय देशांत वणव्याचे तांडव
फ्रान्समधील परिस्थिती सुधारत असली, तरी दक्षिण युरोपमधील अनेक देश अजूनही या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. तुर्कियेच्या मुग्ला आणि अंटाल्या या पर्यटनस्थळांसह पश्चिमेकडील चार प्रांतांमधील जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे.
तीव्र वारे आणि उष्ण हवामानामुळे आग पसरत असून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. ग्रीसमधील क्रेते बेटावर वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना तीन अग्निशामक जवानांचा मृत्यू झाला आहे.





