मुंबई : आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्यादेखील जास्त आहे. या मोबाईलमुळे एकमेकांच्या संपर्कात राहण्यापासून कॅमेरा, ईमेल, टीव्ही सारख्या अनेक गोष्टी मोबाईलमुळे सहज शक्य झाल्या आहेत. मात्र काही भामटे या तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक करतात. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय या सर्वावर लक्ष ठेवून असते. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय यूजर्ससाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे. उद्यापासून म्हणजेच 11 डिसेंबर 2024 पासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) संदेश ट्रेसेबिलिटी नावाचा नवीन नियम लागू करत आहे. का लागू करण्यात आला नियम ? तुमच्या मोबाईलवर येणारे स्पॅम मेसेज कमी करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. हा नवीन नियम १ डिसेंबर रोजी लागू करण्यात येणार होता. पण सेवा पुरवठादारांना तयारीसाठी थोडा अधिक वेळ देण्यासाठी तो पुढे ढकलण्यात आला होता. मोबाईल युजर्सना दररोज अनेक फसवे, स्पॅम मेसेज आणि कॉल्स येतात. यांचा मूळ स्त्रोत शोधणे कठीण असते. यात बदल करण्यासाठी ट्रायने हा नियम लागू केला आहे. काय होणार फायदा? तुम्हाला आलेल्या स्पॅम मेसेजचा स्त्रोत शोधणे आता सोपे होणार आहे. यामुळे लोकांची फसवणूक होणार नाही. या नवीन प्रणालीमुळे मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीपासून ते पोहोचवणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा शोध या नियमद्वारे करण्यात येणार आहे. महत्त्वाचे मेसेज येण्यास उशीर होणार नाही या नवीन नियमामुळे बँकिंग आणि इतर सेवांसाठी ओटीपीसारखे महत्त्वाचे मेसेज येण्यास उशीर होणार नाही याचीही काळजी ट्रायकडून घेण्यात आली आहे. महत्त्वाचे मेसेज वेळेवर पोहोचतील, असे ट्रायकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या नवीन नियमानुसार, नोंदणी नसलेले प्रमोशनल मेसेज आणि स्पॅम ब्लॉक केले जातील. यामुळे यूजर्सना जाहिराती आणि प्रचारात्मक मेसेज ओळखणे सोपे होईल.