No TV, No Mobile : आधुनिक काळामध्ये दिवाणखान्यातील टीव्ही आणि हातातील मोबाइल फोन (No TV, No Mobile) हे जीवनशैलीचे अविभाज्य भाग झाले असतानाच महाराष्ट्र राज्यासह देशातील काही शहरांमध्ये मोबाइल आणि टीव्हीपासून नवीन पिढीला दूर ठेवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सायंकाळी 7 ते 9 या कालावधीमध्ये टीव्ही आणि मोबाइल (No TV, No Mobile) पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी कर्नाटकातील हलगा आणि अथणी तालुक्यातील वडगाव या गावांमध्येही याच कालावधीमध्ये मोबाइल आणि टीव्हीवर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर कर्नाटक सरकारने नुकताच एक निर्णय घेऊन 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यावरही बंदी घातली आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या मोठ्या देशांनीसुद्धा आपल्या देशातील अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर प्रतिबंध घातले आहेत. No TV, No Mobile ज्या अर्थी अशा प्रकारे टीव्ही आणि मोबाइलपासून नवीन पिढीला दूर ठेवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, ते पाहता ही आधुनिक साधने जरी एकीकडे उपयुक्त असली तरी या साधनांचे तोटेसुद्धा नव्याने समोर येत असल्याने अनेक प्रशासनांना अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागत आहे. टीव्ही आणि मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे माणसांमधील संवाद कमी झाला आहे. एकमेकांना भेटून एकमेकांची हालहवाल विचारण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. 7 ते 9 या कालावधीमध्ये टीव्ही आणि मोबाइल बंद असताना लोकांमधील प्रत्यक्ष संवाद वाढणार आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 5000 पेक्षा जास्त डिजिटल मित्र असलेल्या अनेकांना प्रत्यक्षात मित्रांची टंचाई भासत असते हे वास्तव आहे. कोणताही मीडिया असला तरी त्याची मुख्य उद्दिष्टे माहिती देणे, ज्ञान देणे, शिक्षण देणे आणि मनोरंजन करणे हेच असते. पण गेल्या काही कालावधीमध्ये मुख्य मीडिया असो किंवा सोशल मीडिया यामध्ये ज्ञान देण्यापेक्षा चुकीची माहिती देणे, अर्धवट माहिती देणे किंवा मनोरंजनाला अतिरिक्त प्राधान्य देणे याच हेतूने ही माध्यमे चालवली जात असल्याचे लक्षात येते. चुकीच्या माहितीमुळे किंवा अर्धवट माहितीमुळे गैरसमजाची भावना तयार होते आणि समाजमनही कलुषित होते. अशा अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या आहेत. आजही सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे एखाद्या विषयावर चुकीच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतो ते पाहता समाजाच्या मनात विनाकारण राग निर्माण करून त्यांची मने कलुषित करण्याचे कामच अनेक वेळा सोशल मीडियाची माध्यमे करत असतात. या पार्श्वभूमीवर दिवसातून दोन तास का होईना टीव्ही आणि मोबाइलपासून नव्या पिढीला दूर ठेवण्याचे धोरण निश्चित स्वागतार्ह मानावे लागेल. कोविड महामारीच्या कालावधीमध्ये मोबाइलच्या माध्यमातून जे अनेक फायदे समोर आले होते, त्यामुळे लहान मुलांनासुद्धा मोबाइलचा वापर करून देण्यात यावा अशा प्रकारचा विचार समोर आला होता. कोविड महामारीच्या कालावधीमध्ये शिक्षण देण्यासाठी मोबाइल अत्यंत उपयुक्त ठरले होते. पण प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाल्यावरसुद्धा मोबाइलच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण सुरूच राहिले. 24 तासांच्या दिवसांपैकी दोन तास या दोन माध्यमांपासून नवीन पिढीला दूर ठेवले म्हणून काय फरक पडणार आहे अशा प्रकारचा प्रश्नही विचारला जाईल. पण शेवटी या दोन तासांमध्ये मोबाइल आणि टीव्ही सोडून जे काही सकारात्मक केले जाणार आहे, त्याचीसुद्धा भविष्यामध्ये सवय लागण्याची अंधुक आशाही या निमित्ताने निर्माण होऊ पाहत आहे. लहान मुलांना मोबाइलपासून आणि टीव्हीपासून कसे दूर ठेवायचे याचा निर्णय अंतिमतः पालकांच्या हातात असतो. आपला मुलगा मोबाइल किती कौशल्याने हाताळतो हे कौतुकाने सांगणार्या पालकांना नंतर त्याला लागलेली मोबाइलची सवय बंद करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आधुनिक काळामध्ये मोबाइलसारखे प्रभावी संवाद माध्यम संपूर्णपणे बाजूला ठेवणे कधी शक्य नाही. पण या मोबाइलचा जो प्रमुख वापर आहे तो म्हणजे संवाद साधणे, त्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व नवीन पिढीला समजावून देण्याची गरज आहे. धाराशिव असो किंवा कर्नाटकातील काही गावे असोत, त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे त्याचे काय सकारात्मक परिणाम होत आहेत हे नजीकच्या कालावधीमध्ये लक्षात येतीलच. पण अशा प्रकारचे निर्णय सरकारने न घेता कौटुंबिक पातळीवर पाल्यांसाठी नो टीव्ही, नो मोबाइल अशी नीती जर पालकांनी आखली तर भविष्यकाळामध्ये निश्चितच काही सकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.