Satara: सातारा-लोणंद महामार्गावरील वाहतूक वळवली; 28 सप्टेंबरपासून अंमलबजावणी
Satara वाढे व वडूथ येथील हे दोन्ही पूल दगडी कमानीचे असून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या स्थळ पाहणी व तपासणीत पुलांच्या संरचनात्मक स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Satara: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166-डीवरील वाढे व वडूथ गावाजवळील वेण्णा आणि कृष्णा नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुलांच्या संरचनात्मक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून 20 जून 2027 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असा तब्बल नऊ महिने या मार्गावरील अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग लागू करण्यात आले आहेत. याबाबत सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अधिसूचना जारी केली आहे.
वाढे व वडूथ पूल अधिसूचना
वाढे व वडूथ येथील हे दोन्ही पूल दगडी कमानीचे असून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या स्थळ पाहणी व तपासणीत पुलांच्या संरचनात्मक स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळ्यात पुलांवर पाणी पाझरणे, संरचनात्मक तडे तसेच कमानीच्या काही भागांमध्ये झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पुलांवरून हलकी वाहने वळविण्यात आलेली नसून ती पूर्वीप्रमाणेच मार्गावरून जाऊ शकतील. तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाहतूक, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बस आणि अन्य आवश्यक सेवांतील वाहनांना पुलावरून ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अशी असेल अवजड वाहनांची वाहतूक
1) लोणंदहून सातार्याकडे येणारी वाहने लोणंदहून खंडाळा/शिरवळमार्गे पुणे-बंगळूर महामार्गावरून सातार्याकडे येतील.
2) सातार्याकडून वाढे फाट्याकडे जाणारी अवजड वाहने वाढे फाट्यावरून न वळता सरळ पुणे-बंगळूर महामार्गाने खंडाळा/शिरवळमार्गे लोणंद/फलटणकडे जातील.
3) सातारा बाजूकडून फलटणकडे जाणारी अवजड वाहने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव-एसगाव-ताथवडे घाटमार्गे फलटणकडे वळविण्यात आली आहेत.
4) फलटणकडून येणारी अवजड वाहने फलटण-ताथवडे घाट-पुसेगाव-कोरेगाव मार्गे सातार्याकडे येतील.
5) फलटण बाजूकडून आदर्की फाटा (फौजी ढाबा) येथून पिंपोडे बुद्रुक-सर्कलवाडी-शिरगाव घाट-जोशीविहीरमार्गे पुणे-बंगळूर महामार्गाने सातार्याकडे जाता येईल. आदर्की फाट्यावरून लोणंदमार्गे खंडाळा/शिरवळ मार्गेही वाहतूक वळविण्यात आली आहे.
पोलीस बंदोबस्त अन् दिशादर्शक फलक
वाहतूक वळविण्यात आलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याबरोबरच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी नव्या वाहतूक व्यवस्थेची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





