Satara: विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा ‘ऑन द स्पॉट’ वॉच दणदणाट पडणार महागात; १८ ते २५ मंडळांकडून ध्वनीवर्धक यंत्रणेसाठी परवानगीची मागणी
Satara पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी डीजे सिस्टिमचा प्रत्यक्ष डेमो देत ‘नो एमपी, नो एचएफ’चा स्पष्ट संदेश दिला आहे. डीजेमध्ये वापरले जाणारे मिड प्रेशर आकाराने लहान असले तरी त्यातून मोठ्या तीव्रतेचा आवाज निर्माण होतो.

Satara: गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटाला लगाम घालण्यासाठी सातारा पोलिसांनी आता थेट मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. ‘मिड प्रेशर’चा कर्णकर्कश आवाज मर्यादेपलीकडे गेल्यास केवळ समज देऊन मोकळे न होता संबंधित मंडळावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार आहे. शहरातील १५४ गणेशोत्सव मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यासाठी सुमारे १८ ते २५ मंडळांनी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीतील प्रत्येक ध्वनीवर्धक यंत्रणेवर पोलिसांची थेट नजर राहणार आहे. ज्या मंडळांच्या मिरवणुकीत ध्वनीवर्धक यंत्रणा असतील, त्या ट्रॅक्टरवर सातारा पोलिसांचा स्वतंत्र कर्मचारी तैनात केला जाणार आहे. ‘मिड प्रेशर’मधून होणाऱ्या आवाजाची श्राव्यता तपासण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर राहणार आहे. निर्धारित ध्वनीपातळीपेक्षा आवाज अधिक झाल्याचे आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्याबरोबरच मिरवणूक संपल्यानंतर ध्वनीवर्धक यंत्रणा ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे.
एसपींचाच ‘लाईव्ह’ डेमो
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी डीजे सिस्टिमचा प्रत्यक्ष डेमो देत ‘नो एमपी, नो एचएफ’चा स्पष्ट संदेश दिला आहे. डीजेमध्ये वापरले जाणारे मिड प्रेशर आकाराने लहान असले तरी त्यातून मोठ्या तीव्रतेचा आवाज निर्माण होतो. त्यामुळे त्याचा वापर टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन बेस आणि दोन टॉपला परवानगी असली तरी त्यामध्ये मिड प्रेशरचा वापर करता येणार नाही, हे निखिल पिंगळे यांनी स्पष्ट केले आहे. नियम धाब्यावर बसवून मिड प्रेशरचा वापर झाल्यास घटनास्थळीच उपकरण जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. डीजेसोबत लेझरच्या वापराबाबतही पोलिसांनी मंडळांना सावध केले आहे. लेझर किरणांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम होण्याचा धोका असल्याने त्याचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलीस आणि सातारा शहर पोलिसांकडून शहरातील गणेश मंडळांना पारंपरिक वाद्यांवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, विसर्जन सोहळ्याचा बंदोबस्त आणि त्याचे मायक्रो प्लॅनिंग येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार आहे. गणेशोत्सव विसर्जन सोहळ्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज असल्याचे उपअधीक्षक विपुल पाटील यांनी सांगितले.
पोलिसांचा ‘फोर पॉइंट’ ॲक्शन प्लॅन
• मिड प्रेशरच्या आवाजावर पोलिसांची थेट नजर
मिरवणूक ट्रॅक्टरवर स्वतंत्र पोलीस कर्मचारी तैनात.
• मर्यादेपेक्षा आवाज वाढला तर नोटीस
ध्वनीपातळीचे उल्लंघन झाल्यास तातडीने कारवाई.
• मिरवणुकीनंतर यंत्रणा ताब्यात
नियमभंग करणाऱ्या मंडळांची ध्वनीवर्धक उपकरणे जप्त करण्याची तयारी.
• लेझरलाही ‘नो एंट्री’
डोळ्यांना धोका असल्याने लेझरचा वापर टाळण्याचे पोलिसांचे आवाहन.





